मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल, पिनराई विजयन म्हणाले…

केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य भाजप मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं. यावर कॉंग्रेसमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला होता. राणे यांच्या याच वक्तव्यावर आता केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अपक्षेत घेत त्यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे यांची ही टिप्पणी अत्यंत द्वेषपूर्ण आणि पूर्णपणे निषेधार्ह असल्याचे सांगत पिनाराई विजयन यांनी ही संघ परिवाराची केरळविरुद्ध द्वेषाची मोहीम असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले पिनाराई विजयन?

X वर एक पोस्ट करत पिनाराई विजयन म्हणाले की, “महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी केरळला मिनी पाकिस्तान, असं संबोधणं अत्यंत द्वेषपूर्ण आणि निंदनीय आहे. धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिक सौहार्दाचा बालेकिल्ला असलेल्या केरळच्या विरोधात, असं वक्तव्य करणं अत्यंत घृणास्पद आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सर्व लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष शक्तींना संघ परिवाराच्या द्वेषपूर्ण प्रचाराविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन करतो.”

काय म्हणाले होते नितेश राणे?

नितेश राणे म्हणाले होते की, ”केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे, तेथील अतिरेक्यांच्या मतांवरच प्रियांका गांधी तिथून निवडून आल्या.” यावर काँग्रेसने संताप व्यक्त करत राणे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करत त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.