
राज्य परिवहन आगाराची गगनबावडा-नृसिंहवाडी ही गगनबावडा एस.टी. बस काल रात्री लाईट नसतानाही आठ वाजता साळवण ते गगनबावडा धावली. रात्री 8.30 च्या दरम्यान हा प्रकार शेणवडे-गुरववाडी येथे निदर्शनास आला. यावेळी एकप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळल्याचा प्रकार घडला. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
गगनबावडा– नृसिंहवाडी (एम.एच.40 एन 9443) या एसटीला साळवण येथे तांत्रिक बिघाड झाल्याने गाडीला हेडलाईट नव्हती. त्यामुळे एस.टी.आगाराने याबाबत ताबडतोब दुसरी गाडी उपलब्ध करणे गरजेचे होते. मात्र, गगनबावडा आगाराने गाडी उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर हेडलाईट नसताना 30 ते 35 प्रवाशांना घेऊन एस.टी.गगनबावडय़ाकडे निघाली होती. दरम्यान, हेडलाईट बंद पडल्यावर चालकाने आगार व्यवस्थापकांशी याबाबत संपर्क साधला होता. त्यावेळी ‘हळूहळू गाडी घेऊन
या’, असे चालकास सांगितले गेले. साळवणमधून जवळपास 26 किमी अंतर रात्री 8 च्या सुमारास लाईट नसतानाही पार करणे म्हणजे एकप्रकारे प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये गगनबावडा आगाराचा गलथान कारभार चव्हाटय़ावर येत आहे. यावेळी काही वाहनधारकांच्या उजेडाचा आधार घेऊन ही एस.टी.धावत होती. एकीकडे दिवसाढवळ्या अपघातांची संख्या वाढत असताना रात्री अंधारातून एस.टी. चालवून गगनबावडा आगाराने काय साध्य केले? याबाबत काही अघटित घडले असते तर जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशी करत आहेत.
हेडलाईट बंद असताना दुसऱया एसटीची सोय आगाराने करायला हवी होती. ड्रायव्हरला गाडी घेऊन ये म्हणणाऱया ‘त्या’ अधिकाऱयावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
– राणोजी सुतार, सामाजिक कार्यकर्ते
गगनबावडा–नृसिंहवाडी ही एसटी नादुरुस्त असल्याने दुरुस्तीसाठी कोल्हापूरला पाठवणार आहे. तांत्रिक बिघाडावेळी त्यामधील काम ताबडतोब करणे शक्य नव्हते.
– सुरेश शिंगाडे, व्यवस्थापक, गगनबावडा आगार