
शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणारे पॉकेटबुक आज काढले. 1997 ते 2022 असे मुंबईतील ठाकरी तेजपर्व आणि त्यानंतरच्या काळ्या गद्दारयुगाची तुलना या पॉकेटबुकात करण्यात आली आहे. गद्दारपर्वात झालेल्या मुंबईच्या वाताहतीची चिरफाडही करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे यांच्या संकल्पनेतून हे पॉकेटबुक काढण्यात आले आहे. त्यात शिवसेनेने महापालिकेतील सत्ताकाळात केलेल्या जनहिताच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
मुंबईकरांच्या आशीर्वादामुळे 1997 पासून 2022 पर्यंत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत होता. उद्धव ठाकरे यांनी दिवाळखोरीत गेलेल्या महापालिकेला या कालावधीत काटेकोर अर्थ नियोजन करून देशातील श्रीमंत महापालिका बनवली. 1997 ते 2022 पर्यंत महापालिकेत मुंबईकरांच्या विश्वासाच्या बळावर शिवसेनेची सत्ता होती. त्या कालावधीत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पालिकेचा अर्थसंकल्प 40 हजार कोटींवर गेला आणि मुदत ठेवी 92 हजार कोटींपर्यंत पोहोचल्या. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प गोवा, त्रिपुरा, सिक्कीम, नागालॅण्ड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश ही राज्ये आणि मालदीव, भूतान, आईसलॅण्ड या देशांपेक्षा अधिक आहे.
उद्धव ठाकरे यांनी महापालिकेची महसुली तूट भरून काढताना मुंबईकरांवर कोणताही कर लादला नाही. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर कायमचा माफ केला. कर भरण्यासाठीही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या. जगावर कोणतेही संकट आले तरी मुंबई महापालिका कोलमडू नये म्हणून शिवसेनेने मुदत ठेवी राखून ठेवल्या होत्या. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड टोल-फ्री राहिला तसेच कोस्टल रोडसाठी 12 हजार 500 कोटी देता आले तो या मुदत ठेवींमुळेच शक्य झाले. इतर आरोग्य व स्वच्छता, पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतुकीबरोबरच कर्मचाऱयांचे पगार व निवृत्तीवेतनासाठीही मुदत ठेवी राखीव ठेवल्या होत्या.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ‘बेस्ट’
मुंबईकरांसाठी बेस्ट बसचा प्रवास शिवसेनेने स्वस्त केला. किमान 5 रुपये तिकीट दर होते. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणाचे लक्ष्य समोर ठेवून स्वस्त तिकीट दरांसह 2027 पर्यंत मुंबईत 10 हजार इलेक्ट्रिक बेस्ट बसेस मुंबईकरांच्या सेवेत रुजू करण्याचे नियोजन केले होते. आजा मुंबईत इलेक्ट्रिक एसी बसेस, मिनी बसेस, डबल डेकर बसेस दिसतात त्याचे श्रेय आदित्य ठाकरे यांना जाते.
1 कोटी रुग्णांवर माफक दरात उपचार
मुंबई महापालिकेकडून दरवर्षी 1 कोटी 46 हजार रुग्णांना माफक दरात उपचार पुरवले जातात. महापालिकेची 5 वैद्यकीय महाविद्यालये, 6 विशेष रुग्णालये, 29 प्रसूतीगृहे, 16 उपनगरीय रुग्णालये, 190 दवाखाने, 212 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मुंबईकरांना उपचार मिळतात. औषधेही विनामूल्य दिली जातात. वैद्यकीय चाचण्या माफक दरात होतात. मोफत लसीकरण होते. ही आरोग्य सुविधा उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुखाप्रमाणे सांभाळली.
मुंबई चोवीस तास
चोवीस तास धावणाऱया मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सही चोवीस तास उघडी असायला हवीत अशी आदित्य ठाकरे यांची संकल्पना होती. सुरुवातीला नाईट लाईफ म्हणत त्यावर टीका झाली. पण आज लाखो मुंबईकरांना त्याचा फायदा होत आहे. उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशन्स, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अशी महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने केलेली कामे प्रशंसनीय ठरली.
देशात सर्वात स्वस्त व शुद्ध पाणीपुरवठा मुंबईत
देशात सर्वात स्वस्त पाणीपुरवठा मुंबई महापालिका करते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेने बांधलेल्या मध्य वैतरणा धरणामुळे पाणी साठवण क्षमता वाढली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या धरणावर वीजनिर्मिती केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर केला. आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्रही महापालिकेने उभारले. त्यात प्रक्रिया केलेले पाणी बिसलेरीच्या पाण्यापेक्षाही शुद्ध आहे. शिवसेनेच्या कार्यकाळात मुंबईला कधीही पाणीटंचाई जाणवली नाही. पिण्याचे पाणी दूषित होऊ नये म्हणून जलवाहिन्या जमिनीपासून 90 फूट खोलवर नेण्यात आल्या. मुंबईतील जलवाहिन्यांवर अद्ययावत यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जाते.
हे करून दाखवलं
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ‘बेस्ट’
- मुंबई पब्लिक स्कूलने बदलला शिक्षणाचा चेहरामोहरा
- दरवर्षी 1 कोटी रुग्णांवर माफक दरात उपचार
- देशात सर्वात स्वस्त व शुद्ध पाणीपुरवठा
- कोस्टल रोड… कुशल राज्यकर्त्याची चुणूक दाखवणारा प्रकल्प
- वरळी-शिवडी कनेक्टर आणि अटल सेतूचा प्रारंभ
- कोविड व्यवस्थापनाच्या मुंबई मॉडेलचे जगात कौतुक
- उद्याने उभारली, मैदाने बनवली, जंगले वाचवली
- मुंबई चोवीस तास
मुंबईचा काळा अध्याय
25 वर्षांत अथक परिश्रमातून शिवसेनेने घडवलेली मुंबई ‘थैलीशहां’ना पाहवली नाही. त्यामुळेच फंदफितुरांना घेऊन 2022 पासून त्यांनी मुंबईचा काळा अध्याय लिहायला सुरुवात केली असे म्हणत त्यानंतर अडीच वर्षांत मुंबईची वाताहत झाल्याचे या पुस्तिकेत नमूद आहे.
- मिंधे गँगने महापालिकेच्या मुदत ठेवींतील 10 हजार कोटी मोडून उधळपट्टी केली.
- महापालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे.
- एक्स रे फिल्म व वैद्यकीय साहित्याच्या कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार होतोय
- बेस्ट बसेसचा ताफा दोन हजारांनी घटवला गेला. तिकीट दर दुप्पट केले.
- मुंबई पब्लिक स्कूलवर घाव घालण्यासाठी प्रत्येक वॉर्डात सीबीएसई शाळा जाहीर केली, परंतु तिथे शिक्षक व सुविधाच नाहीत.
- मुंबईत भीषण पाणीटंचाई जाणवू लागली.
- एका वर्षात रस्ते खड्डेमुक्त व काँक्रीटचे करू हे दावे खोटे ठरले.
- रस्ते दुरुस्ती प्रकल्पांमध्ये 6 हजार कोटींचा घोटाळा केला.
- कोस्टल रोडचा खर्च वाढवला. तिथे जाहिराती लावून विद्रुपीकरण केले.
- हिमालय पूल कोसळून 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याच कंपनीला काँक्रीट रस्त्याचे कंत्राट दिले.
- मुंबईतील 1100 एकर जमीन अदानीच्या घशात घातली.
- मुंबईकरांवर कचरा टॅक्स लावला.
- स्ट्रीट फर्निचरमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा केला.






























































