
फोर्ट परिसरातील एका फर्ममध्ये घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरून विमानाने परराज्यात पळून गेलेल्या चार आरोपींना पकडण्यात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना यश मिळाले. अतिदुर्गम भागात 10 दिवस वेशांतर करून लपून राहत पोलिसांनी चौघांना उचलले. त्यांच्याकडून 25 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
23 फेब्रुवारी रोजी फोर्ट येथील आस्था गुरू ऑक्शन फर्ममध्ये घरफोडीची घटना घडली होती. आरोपींनी खिडकीचे ग्रिल तोडून आत घुसत ऑक्शनसाठी ठेवलेली महागडी घडय़ाळे, फोटोग्राफीचे कॅमेरे चोरून नेले होते. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी 50 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी चेहरा झाकून फिरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तांत्रिक व खबऱयांच्या मार्फत तपास केला असता आरोपी विमानाने बिहार व बंगालला पळून गेल्याचे आढळून आले.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी केले वेशांतर
पोलिसांची दोन पथके बनवून त्या दोन्ही राज्यांत धडकले. आरोपी राज्यातल्या अतिदुर्गम भागात राहत होते. पोलीस तेथे जाऊन 10 दिवस वेशांतर करून राहिले. मग शिताफीने छोटू मिंया हुसैन, मुनावर शेख, मोहम्मद शेख, अचबुल शेख अशा चौघांना पकडले.

























































