
बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर आज अखेर प्रत्यक्ष मतदान पार पडले. तब्बल 10 हजार जणांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. आता ही मते कोणाच्या पारड्यात पडणार आणि कुठले पॅनेल बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. उद्या, मंगळवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे.
आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, जोरदार प्रचार, निवडून दिल्यानंतर भरीव काम करण्याचे देण्यात येणारे आश्वासन यामुळे बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्थेची निवडणूक रंगतदार झाली होती. परिवर्तन, उमंग, स्वामी समर्थ, संजीवनी आणि दक्षता हे पाच पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या पाचही पॅनेलने प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडवून दिला होता. आज शहरातील 12 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान पार पडले. 28 हजार 60 मतदारांपैकी 10 हजार मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. एकूण 39 टक्के मतदान झाले. त्यामुळे ही मते पुठल्या पॅनेलच्या पारड्यात पडणार आणि कुठले पॅनेल बाजी मारणार याकडे पोलीस दलातील सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.