पोलिसांचा सरकारकडे 12 गस्ती बोटींचा प्रस्ताव, ठाणे-पालघर सागरी सुरक्षेचे कडे होणार भक्कम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संवेदनशील असलेल्या ठाणे-पालघर जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेचे कडे अधिकच भक्कम होणार आहे. पोलीस प्रशासनाने सरकारला प्रस्ताव पाठवत नवीन 12 गस्ती बोटी देण्याची मागणी केली आहे. याबाबतची निविदा प्रक्रियाही सुरू झाली असून या बोटी ताफ्यात दाखल झाल्यास मुंबईच्या वेशीपासून ते थेट महाराष्ट्र-गुजरातच्या हद्दीपर्यंत समुद्रातील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

पालघर जिल्ह्याला झाईपासून वसईपर्यंत विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून त्यालगत ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसरालाही मोठी किनारपट्टी आहे. या संपूर्ण किनारपट्टीवर सध्या कार्यरत असलेल्या गस्ती बोटींपैकी अनेक बोटी जुन्या झाल्या आहेत. काही बोटी भाड्याने घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे गस्तीची क्षमता मर्यादित होत असल्याने नवीन बोटींची गरज भासत होती. याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यासाठी 4, विरार परिसरासाठी 4 आणि मीरा-भाईंदरसाठी 4 अशा एकूण 12 आधुनिक गस्ती बोटींची मागणी करण्यात आली आहे. या बोटींच्या माध्यमातून सागरी गस्त अधिक प्रभावीपणे राबवता येणार असून किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.

निविदा प्रक्रियेला सुरुवात

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात बोटी खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. ’26/11′ च्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेबाबत अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या असून त्याचाच भाग म्हणून हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या सागरी सुरक्षेसाठी पोलिसांकडून सागरी गस्त, सागरी पोलीस ठाणे, चेक पोस्ट, नाकाबंदी, ‘सागरी कवच’ व ‘सागर सुरक्षा’ यांसारखी विविध अभियान राबवली जात आहेत. सागरी सुरक्षेची एकूण जबाबदारी नौदलाकडे असली तरी किनाऱ्यापासून दोन नॉटिकल मैलांपर्यंत तटरक्षक दल आणि 0 ते 12 नॉटिकल मैलांपर्यंत राज्य सागरी पोलीस कार्यरत असतात.