दर्गा हटविलेल्या ठिकाणी जाण्यास बंदी; हुसेन दलवाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिकच्या काठे गल्लीतील सातपीर दर्ग्याचे बांधकाम महापालिकेने हटविल्याने येथे तणावपूर्ण शांतता आहे. या ठिकाणी जाण्यास मंगळवारी पोलिसांनी काँग्रेस नेते, माजी खासदार हुसेन दलवाई यांना मज्जाव करीत ताब्यात घेतले. ही कारवाई अयोग्य असल्याचे दलवाई यांनी सांगितले.

नाशिकच्या काठे गल्लीतील सातपीर दर्ग्याचे बांधकाम महापालिकेने 16 एप्रिल रोजी हटविले. यानंतर येथे दंगल उसळली होती. आता तणावपूर्ण शांतता आहे. मंगळवारी काँग्रेस नेते, माजी खासदार हुसेन दलवाई हे या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी आले. हटविलेल्या दर्गास्थळाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडविले. ‘मी फक्त पाहणी करतो, माथा टेकवून परत जातो, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही’, असे सांगूनही पोलिसांनी त्यांना जुमानले नाही. उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेवून गंगापूर पोलीस ठाण्यात नेले, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.