बंदी असतानाही 300रुपये घेऊन अवजड वाहनांना प्रवेश, भिवंडीत वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी मानकोली नाक्यावर वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीचा भंडाफोड झाला होता. त्यानंतर काही काळ वाहतूककोंडी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा भिवंडी वाहतूक पोलिसांची हप्तेखोरी समोर आली आहे. गोदाम पट्ट्यात ठरावीक वेळेत प्रवेशबंदी असतानाही पोलीस 300रुपये घेऊन सर्रास अवजड वाहनांना सोडत असल्याने अंजूरफाटा, खारेगाव, मानकोली नाक्यावर वाहतूककोंडी वाढली आहे. हप्तेखोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांच्या अजब कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भिवंडीत वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली असून शहरालगतच्या ग्रामीण पट्ट्यात असलेल्या गोदामांमध्ये अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करत असल्याने भिवंडीतील अंजूरफाटा, काल्हेर, कशेळी ते ठाणेमार्ग त्याचबरोबर अंजूरफाटा, वळगाव, दापोडे, मानकोली तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर पिंपळास ते खारेगाव ब्रिजपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूककोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी वाहतूक विभागाने भिवंडीत अवजड वाहनांना बंदी केली आहे. यासंदर्भातील वेळापत्रकदेखील वाहतूक विभागाने प्रसिद्ध केले आहे. मात्र असे असताना भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात पोलीस चालकांकडून 300रुपये घेऊन अवजड वाहनांना थेट रस्त्यावर प्रवेश दित आहेत.

खाबुगिरीचा लाईव्ह भंडाफोड
भिवंडीतील अॅड. भारद्वाज चौधरी यांनी वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीचा सोशल मीडियाद्वारे लाईव्ह भंडाफोड केला. सध्या ही व्हिडीओ क्लिप प्रचंड व्हायरल होत असून भिवंडीतील वाहतूककोंडीला वाहतूक पोलिसांची हप्तेखोरी कशी जबाबदार आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आले आहे.