
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. इंडिया आघाडीसोबत असलेले झारखंड मुक्ती मोर्चा व पंजाबमधील अकाली दल हे दोन पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
झामुमोचे सर्वेसर्वा व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चार दिवसांपासून दिल्लीत सपत्नीक तळ ठोकून आहेत. कथित खनिज घोटाळ्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ही अटक टाळण्यासाठी त्यांनी भाजपशी जवळीक वाढवल्याचे समजते. मागच्या चार दिवसांत त्यांनी विनोद तावडे व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. या बैठकीत सत्तावाटपाची चर्चा झाल्याचे समजते. नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीत स्थान न दिल्याने हेमंत सोरेन हे काँग्रेसवर नाराज आहेत. एनडीएत जाण्यासाठी त्यांना हे निमित्त मिळणार आहे. लोकसभेत केवळ एक खासदार असलेल्या अकाली दलाशीही भाजपने पुन्हा जुळवून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अकाली दलाला सत्तेत घेण्याचा प्रस्ताव भाजपने दिला आहे.
सत्तेचा फॉर्म्युला
हेमंत सोरेन यांनी पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्रीपद द्यावे व भाजपला एका उपमख्यमंत्रीपदासह चार खाती द्यावीत, अशी अट भाजपने ठेवल्याचे समजते. त्यावर सोरेन यांनी अजून प्रतिसाद दिलेला नाही. संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर यासंदर्भात घडामोड घडू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिंदे, अजित पवार सत्तेबाहेर?
झामुमो व अकाली दल भाजपसोबत आल्यावर केंद्रातील भाजपला बहुमतासाठी इतर पक्षांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा महाराष्ट्रात ठरवून कार्यक्रम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण यांच्या तक्रारी एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतरही भाजपच्या ‘ऑपरेशन शिंदे’वर परिणाम झालेला नसल्याचे समजते. दिल्लीतील गणिते जुळल्यास शिंदे आणि अजित पवारांना सत्तेबाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


























































