बुलेट ट्रेनच्या कामामुळे मुंबईत प्रदूषण, काम थांबवण्याची कंत्राटदाराला नोटीस

बांद्रा-कुर्ला संकुल (BKC) येथे सुरू असलेले बुलेट ट्रेन टर्मिनसचे काम सध्या थांबवण्यात आले आहे. बांधकामादरम्यान वायूप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन झाल्याने थांबवण्यात आले आहे. सध्या मुंबईत वाढत्या वायूप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

पण ही कारवाई प्रतिक्रियेच्या स्वरूपातील असल्याची टीका होत आहे. कारण अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील प्रदूषणावर देखरेख ठेवण्यात झालेल्या त्रुटींसाठी मुंबई महापालिकेला (BMC) फटकारले आहे. महापालिकेनेच कबूल केल्याप्रमाणे, शहरातील सूक्ष्म धूलिकण वाढण्यामागे मोठा वाटा बांधकामांचा आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट टिप्पणी केली की, “पालिका कामच करत नाही. कोणतीही देखरेख नाही. महापालिकेने मुद्दाम डोळेझाक केली आहे.”

हिंदुस्थानचा पहिला हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर असलेला हा बुलेट ट्रेन प्रकल्प नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) मार्फत उभारत आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयासह गुजरात आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त प्रकल्प आहे.

बुधवारी महापालिकेने ठेकेदारांना काम थांबवण्याची नोटीस बजावली. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही सुनावणीत स्पष्ट केले की, केवळ बांधकाम थांबवणे हा उपाय नाही; सतत आणि आकस्मिक तपासणी तसेच प्रत्यक्ष अहवाल देण्याची यंत्रणा प्रभावी असणे आवश्यक आहे. ही सुनावणी मुंबईतील वाढत्या वायूप्रदूषणावरील जनहित याचिकेवर झाली.

कंत्राटदारांना देण्यात आलेली दुसरी नोटीस आहे. मात्र, एका वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावेळी प्रदूषण नियंत्रण नियमांचे काटेकोर पालन झाल्याशिवाय काम पुन्हा सुरू होणार नाही. काही प्राथमिक कामे सुरू राहू शकतात; पण खणकाम व माती वाहतुकीसारखे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे.

नियमभंगाचे तपशील

महापालिकेच्या पथकाने बुधवारी तपासणी केल्यानंतर ही नोटीस देण्यात आली. यापूर्वी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने केलेल्या पाहणीतही गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. समितीच्या अहवालानुसार:

जागेवर उभारलेले बॅरिकेड्स नियमांपेक्षा कमी उंचीचे होते
AQI मॉनिटर तपासणीच्या केवळ दोन दिवस आधी बसवण्यात आला होता
CCTV फुटेजमध्ये झाकण नसलेले ट्रक्स, धुळीने भरलेले अंतर्गत रस्ते, पाणी न मारलेले भाग दिसून आले
डेब्रिस तपासणीआधीच घाईघाईत झाकलेले असल्याचे स्पष्ट झाले
टायर-वॉशिंग क्षेत्रे CCTV च्या कक्षेबाहेर असल्याचे आढळले

2 डिसेंबर रोजी शो-कॉज नोटीस देण्यात आल्यानंतरहीअपुरे स्कॅफोल्डिंग, ग्रीन मेशविना टिनशिट्स, AQI डिस्प्ले बोर्ड नसणे, जवळच्या नाल्याच्या काठावर बांधकामावशेष टाकणे, परिसरात दाट धुळीचा थर अशी स्थिती कायम असल्याचे समोर आले. कामगारानेही त्या वेळी पाणी शिंपडण्याची यंत्रणा सुरू नसल्याची कबुली दिली.