चंद्रपूरमधील झरई, झरपट, वर्धा, वैनगंगा नद्यांतील प्रदूषण वाढले, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

<<< अभिषेक भटपल्लीवार >>>

मे महिना अजून सुरू व्हायला बराच अवकाश असताना राज्यात तळपत्या उन्हाने धरणांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यात नद्यांचे प्रदूषण वाढले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय भयंकर झाली आहे. चंद्रपुरातील इरई आणि झरपट या नद्या गटारगंगा झाल्या आहेत तर वर्धा आणि वैनगंगा या मोठ्या नद्याही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातील नद्यांच्या स्वच्छतेचा विषय समोर आला. या पार्श्वभूमीवर, अभ्यासकांनी चंद्रपूर जिह्यातील नद्यांच्या स्थितीचा अभ्यास केला. त्यात गंभीर चित्र समोर आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या संकेतस्थळावर जी माहिती देण्यात आली, त्यापेक्षाही गंभीर स्थिती या नद्यांची असल्याचे चित्र आहे.

उद्योगांची रसायने थेट नदीत

चंद्रपूरमधील इरई आणि झरपट या नद्या पूर्णतः दूषित झाल्या आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये उद्योगांचे रसायन कोणतीही प्रक्रिया न करता सोडत असल्याने त्याचे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही. जिह्यातील उमा, अंधारी या नद्यांची स्थितीही अशीच आहे. शहरातील घाण या नद्यांमध्ये टाकली जात असल्याने त्यांचे रूपांतर गटारात झाले आहे.

आराखडा तयार, पण निधी नाही

राज्यातील नद्यांच्या स्वच्छतेचा आराखडा तयार केला गेला, मात्र त्यासाठी सरकारकडून अद्याप निधी देण्यात आलेला नाही. प्रा. सुरेश चोपणे व कवडू लोहकरे या अभ्यासकांनी याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने चला जाऊया नदीला हा उपक्रम सुरू केला.