
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार असताना भाजपने यमुना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा बनवून आप सरकारला बदनाम केले. यमुना नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न रस्त्यांपासून विधानसभेच्या सभागृहात पर्यंत उपस्थित केला. दिल्लीत भाजपचे सरकार आल्यास यमुना नदीला 100 टक्के स्वच्छ करू असे आश्वासन दिले. परंतु, दिल्लीत सरकार येताच या सर्व आश्वासनांचा भाजपला विसर पडला आहे. केजरीवाल सरकारच्या तुलनेत भाजपच्या काळात यमुना नदीचे प्रदूषण चार पटीने अधिक वाढले आहे, असे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालामुळे भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटला आहे.
या अहवालानुसार, जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये यमुना नदीतील दुषित पाण्याचा स्तर खूपच वाढला आहे. 1 जुलैला घेतलेल्या नदीतील पाण्याच्या नमुन्यात प्रचंड प्रदूषण आढळले आहे. पाण्यातील जीव या नदीत जीवंत राहू शकत नाही, इतके पाणी दुषीत झाले आहे. यमुना नदीतील पल्ला, वजीराबाद, आयएसबीटी ब्रिज, आयटीओ ब्रिज, निजामुद्दीन ब्रिज, ओखला बॅरेज, आग्रा पॅनल, असगरपूर आदी ठिकाणचा परिसर दिल्लीत येतो. या अहवालानुसार, फेईकल कॉलिफॉर्म बॅक्टिरियाचे लेवल खूपच जास्त आहे. आयटीओमध्ये हे जवळपास चार पट जास्त आहे. पल्ला परिसरात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड 8 एमजी मिळाली आहे. ही खूपच भयावह परिस्थिती आहे, असे या अहवालात म्हटले आहे. यमुना नदीत अद्याप मोठया प्रमाणात घाण पाणी येत आहेत. दिल्लीतील जवळपास 22 नाल्यातील पाणी यमुना नदीत येते. ऑक्सिजन कमी असल्याने यमुना नदीतील मोठा भाग प्रदूषित होत आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने यमुना नदीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. यमुना नदी स्वच्छ करू असे आश्वासन देऊन दिल्लीकरांचे मते पदरात पाडून घेतली परंतु, आता यमुना नदीकडे डोळेझाक केलेली दिसत आहे.