‘तेल्या’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फळे क्वारंटाईन, पापरीतील शेतकऱ्याचा डाळिंब बागेत प्रयोग

Pomegranate Quarantine to Control Oily Spot Disease

>> देवीदास नाईकनवरे, मोहोळ

तेल्या रोग प्रादुर्भाव झालेल्या झाड, फळांपासून इतर फळांचे संरक्षण व्हावे, या हेतूने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोहोळ तालुक्यातील पापरी येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने आपल्या 6 एकर क्षेत्र डाळिंब बागेतील तब्बल 2 लाख 40 हजार डाळिंब फळांना रद्दी पेपरमध्ये क्वारंटाईन केले आहे. यासाठी सुमारे 1 लाख दहा हजार रुपये खर्च आल्याचे शेतकरी पद्माकर भोसले यांनी सांगितले.

पापरी परिसरातील डाळिंब बागांमध्ये मृग बहार धरला असून, त्याची फळे 80 ते 100 ग्रॅम वजनाची लिंबाच्या आकाराची झाली आहेत. मात्र, त्यावर तेलकट डाग पडून तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही शेतकरी तेल्या रोगग्रस्त डाळिंबफळे तोडून टाकू लागले आहेत. तेल्या रोगामुळे फवारणींची संख्या वाढू लागल्याने शेतकऱयांचे आर्थिक बजेट ढासळू लागले आहे. एक फवारणी करण्यासाठी पाच हजार रुपयांचा खर्च येतो. सध्या सकाळी ऊन, दुपारी पाऊस आणि संध्याकाळी ढगाळ असे वातावरण आहे. हा हवामान बदल तेल्या रोगास पोषक आहे. तसेच हा तेल्या संसर्गजन्य रोग असल्याने तो बागेत झपाटय़ाने वाढतो.

यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पद्माकर भोसले या डाळिंब उत्पादक शेतकऱयाने आपल्या सहा एकर बागेच्या अडीच हजार झाडांवरील 2 लाख 40 हजार डाळिंब फळांना इंग्लिश रद्दी पेपरचे आवरण घालत ते फळं क्वारंटाईन केली आहेत. तेल्या रोगापासून बचाव करण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केला आहे. सहा एकर बागेतील 50 झाडांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तेल्या हा संसर्गजन्य रोग आहे. प्रादुर्भाव झालेल्या झाडांपासून इतर फळांचे संरक्षण व्हावे, ती बाधित होऊ नये म्हणून झाडांना इंग्लिश रद्दी पेपरचे आवरण घालत फळांचे संरक्षण केले असल्याचे पद्माकर भोसले यांनी सांगितले. डाळिंब संशोधन केंद्राने या परिसरात तेल्या रोगासंदर्भात एखादे चर्चासत्र आयोजित करून मार्गदर्शन करावे, अशी मागणी डाळिंब उत्पादकांमधून होत आहे.

रद्दी पेपर प्रयोगबाबत डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पोखरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘सध्याच्या वातावरणात डाळिंब पिकावर तेलकट डाग, डांबऱया, फळकुज आणि खरडा यासारखे रोग दिसून येत आहे. या रोगांच्या निवारणासाठी व नियंत्रणासाठी संशोधन केंद्राने शेतकरी सल्ले तयार केले आहेत. शेतकरी हे सल्ले केंद्राच्या वेबसाइटवरून मराठीमध्ये डाउनलोड करू शकतात, किंवा प्रत्यक्ष केंद्रास भेट देऊ शकतात. रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ढगाळ वातावरण असताना किंवा पाऊस पडल्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि सूर्यप्रकाश असल्यास आंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य आंतरप्रवाही असा वापर करावा. फळाचे संरक्षण करण्यासाठी इंग्लिश पेपरचा वापर करत असल्यास फळांचे वेळोवेळी निरीक्षण करा. औषधांची फवारणी सर्व फळांपर्यंत पोहोचली नाही तर फळकुज आणि मिली बगचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.’

यामुळेच इंग्लिश रद्दी पेपरचा वापर

झाडांना इंग्लिश रद्दी पेपरचे आवरण 500 किलो रद्दी लागली, मराठी पेपरपेक्षा इंग्लिश पेपरची रद्दी चिवट असून ती लवकर भिजत, फाटत नाही. फवारणी स्प्रे करतानाही अडचण येत नाही आणि पुन्हा उन्हात वाळते म्हणून त्याचा वापर केला. फळांना स्टेपलरच्या साहाय्याने पेपर लावण्यात आले. रद्दी बसविण्यासाठी पंढरपूरमधील धोंडेवाडी येथील मजुरांना 190 रुपये प्रतिकिलो दराने काम दिले आहे. याकामी ते मजूर तरबेज आहेत.

रद्दी पेपरचा तेल्या संरक्षणासाठी वापर केल्यामुळे आता संसर्ग होण्यास अटकाव होऊ लागला असल्याचे जाणवू लागल्याचे पद्माकर भोसले यांच्या निदर्शनास आले आहे.