Pooja Khedkar News – माझा अपमान झाला, पूजा खेडकरचे जुने पत्र व्हायरल

पूजा खेडकर यांची युपीएससीने निवड रद्द केली होती. पण आता पूजा खेडकरचे एक पत्र व्हायरल झाले आहे. त्यात पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहे. इतकंच नाही तर दिवसे यांनी माझा अपमान केला आणि त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे माझी प्रतिमा अहंकारी अधिकारी अशी तयार झाली असे पूजा खेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

8 जुलैला पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितिन गद्रे यांना पत्र लिहून पूजा खेडकर यांच्याविरोधात तक्रार केली होती.

11 जुलैला पूजा खेडकर यांनी शासनाला पत्र लिहून आपला अपमान झाल्याचे म्हटले आहे. पूजा खेडकर यांनी या पत्रात म्हटले आहे की, सुहास दिवसे हे पहिल्या दिवसापासून माझा अपमान करत होते. त्यांनी लिहिलेले पत्र हे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आणि माझी प्रतिमा ही अहंकारी अधिकारी अशी निर्माण झाली. या घटनेमुळे मला मानसिक त्रास झाला. असे असले तरी मी प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम करत होते तरी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मला त्रास दिला असे पूजा खेडकर म्हणाल्या.

पूजा खेडकर यांनी अँटी चेंबर बळकावला असा आरोप करण्यात आला होता. हे आरोपही पूजा खेडकर यांनी फेटाळून लावला. जिल्हाधिकाऱ्यांनी जी जागा दिली ती आपण नम्रपमे स्विकारली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात तक्रार केली. आपली चूक नसतानासुद्धा मी माफी मागितली तरी त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केली असे पूजा यांनी या पत्रात म्हटले आहे.