नागोठणे एसटी स्थानक गेले खड्ड्यात, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये संताप

सर्वात गर्दीचे ठिकाण असलेल्या नागोठणे एसटी स्थानकाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या स्थानकाची चाके चिखलात रुतली असून या राडारोड्यातून हजारो प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. तसेच स्थानक परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे प्रवाशांना नाकाला रुमाल लावून येथून जावे लागते. याबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

नागोठणे एसटी स्थानक म्हणजे नागोठणे विभाग व राज्य परिवहन मंडळाचे मध्यवर्ती ठिकाण. या स्थानकातून अलिबाग, मुरुड, शिर्डी, नाशिक, महाड, पोलादपूर, मुंबई, श्रीवर्धन आदी ठिकाणी बस धावतात. येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या सर्व एसटी बसेस येथे थांबतात. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे स्थानक खड्ड्यात गेले असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे. त्यातच प्रचंड अस्वच्छतेमुळे उकिरडा झाला आहे. पिण्याच्या पाण्याचीसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बोंब आहे. तसेच स्थानक परिसरात झाडाझुडपांचा विळखा पडला आहे.

स्वच्छतागृहाचे तीनतेरा
एसटी स्थानकाच्या आवारात असलेल्या स्वच्छतागृहाचे तीनतेरा वाजले आहेत. स्वच्छतागृहात सतत पडणाऱ्या पाण्यामुळे शेवाळ पसरले आहे. तसेच झाडाझुडपांनी विळखा घातला आहे. ड्रेनेज भरल्याने या स्वच्छतागृहाला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

उपाहारगृह गेली अनेक वर्षे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकाबाहेरील हॉटेलात जाऊन खाण्याची वेळ आली आहे. लांब पल्ल्याच्या बसमधील एखादा प्रवासी खाद्यपदार्थ घेण्यासाठी स्थानकाबाहेर गेला आणि त्याला येण्यास उशीर झाला तर वाहकाला अनेकदा प्रवाशाला शोधण्याची वेळ येते.