आजपासून प्रभादेवीत दीपोत्सव; इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडणार

प्रभादेवीत पहिल्यांदाच ‘प्रभादेवी दीपोत्सव 2025’ या भव्य सांस्कृतिक सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.

17 ते 19 ऑक्टोबर यादरम्यान राजाभाऊ साळवी मैदान, प्रभादेवी येथे हा महोत्सव होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि लोककलेचे दर्शन घडवणारा हा दीपोत्सव परिसरातील नागरिक आणि पाहुण्यांसाठी हा एक अनोखा अनुभव ठरणार आहे.

‘स्मरितो शिवराय’ हे ‘युनेस्को’ जागतिक वारसा यादीत सामील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचे भव्य प्रदर्शन या उत्सवातील प्रमुख आकर्षण असणार आहे. रायगड, सिंहगड, प्रतापगड, लोहगड, तोरणा यांसारख्या शिवकालीन किल्ल्यांची सुंदर मॉडेल्स, माहितीफलक आणि युद्धातील ऐतिहासिक क्षणांचे सादरीकरण यामधून प्रेक्षकांना इतिहासाचा थेट अनुभव घेता येईल. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

प्रभादेवीत प्रथमच होणाऱ्या या दीपोत्सवानिमित्ताने इतिहास, संस्कृती आणि परंपरा एकाच मंचावर येत आहेत. हा दीपोत्सव फक्त एक कार्यक्रम नसून प्रभादेवीच्या समाजजीवनाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे, असे शिवाज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि प्रभादेवी दीपोत्सव समितीचे  आयोजक अभिषेक पाताडे म्हणाले.

पारंपरिक नृत्यप्रकार, पाककला स्पर्धा, फूड स्टॉल

दीपोत्सवात लोककला आणि लोकसंगीत सादरीकरणे, पारंपरिक नृत्यप्रकार, पाककला स्पर्धा, मुलांसाठी सांस्पृतिक कार्यशाळा, फूड स्टॉल्स व कला बाजार यांचाही समावेश आहे. स्थानिक नागरिकांना या कार्यक्रमात सक्रिय सहभागाची संधी देण्यात आली आहे, जेणेकरून हा उत्सव फक्त प्रेक्षकांसाठीच नव्हे, तर समाजासाठी एक सहभागी उत्सव बनेल.