
आकर्षक रंगरंगोटी, नवीन प्रशस्त खुर्च्या यामुळे बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाटय़ मंदिराला नवा साज मिळाला आहे. तीन महिन्यांनी नाटय़गृह पुन्हा एकदा रसिकांसाठी खुले झाल्याने नाटय़रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उपनगरातील नाटय़रसिकांसाठी हक्काचे ठिकाण असलेले बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाटय़गृह नूतनीकरणाच्या कामासाठी गेल्या तीन महिन्यांपासून बंद होते. 1026 आसनक्षमता असलेल्या या नाटय़गृहातील खुर्च्या मोडकळीस आलेल्या होत्या. नूतनीकरणावेळी मुख्य आणि मिनी थिएटरमधील खुर्च्या आणि कार्पेट बदलण्यात आले आहे. याशिवाय काही ठिकाणी फ्लोरिंग बदलले आहे. भिंतींवर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱयाने दिली.
नाटय़गृहाचे व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी ज्ञानोबा कुऱहाडे यांच्यासह रामेश्वरी डिचोडकर, रमेश परमार, पुरुषोत्तम सावंत आदी कर्मचारीवर्गाने रंगदेवतेची पूजा करून शुभारंभ केला.