
>> प्रांजल वाघ
नाशिक–सापुतारा मार्गावर, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर उजव्या बाजूस दिसणारा दुर्गस्थापत्याने नटलेला दुर्ग म्हणजे हस्तगिरी, ज्याला हातगड म्हणून ओळखले जाते. भक्कम तटबंदी असणारा हा दुर्ग दुरूनही उठून दिसतो.
सापुताऱ्याच्या निसर्गरम्य प्रदेशातील भूभाग स्वराज्य संरक्षणाच्या दृष्टीनेही तितकाच संपन्न राहील याकडे मराठा साम्राज्याचे लक्ष होते. याच मांदियाळीतील एक गड म्हणजे दुर्गरत्न हस्तगिरी.
1547 मध्ये भैरवसेन नामक बागुलवंशी राजाने नाशिकजवळील एका निजामशाही किल्ल्यास वेढा दिला. मोठा पराक्रम गाजवून महादेवसेन या त्याच्या पुत्राने हा किल्ला जिंकून घेतला. ‘राष्ट्रौढवंशम् महाकाव्यं’ या ग्रंथात हा किल्ला जिंकून घेतल्याचे उल्लेख आलेले आहेत. तसंच भैरवसेन राजाने या किल्ल्यावर आपल्या विजयानंतर शिलालेख कोरून घेतला आहे. हा किल्ला म्हणजे ‘हस्तगिरी’ ऊर्फ ‘हातगा’ दुर्ग ऊर्फ ‘हातगड’!
नाशिक-सापुतारा मार्गावर, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर उजव्या बाजूस आपल्याला एक प्रशस्त प्रस्तर आकाशात चढलेला दिसतो. तोच प्रस्तर म्हणजे हातगड! सध्या या किल्ल्याच्या दरवाजापर्यंत गाडीरस्ता झालेला आहे. तसेच हातगडवाडीतून साधारण 45 मिनिटांत किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत आपण पोहोचू शकतो.
शरभ शिल्प असलेल्या पहिल्या दरवाजाच्या बाजूच्या कातळात पाण्याचं टाकं आणि कोरलेला हनुमान आहे. इथून पुढे कमानीच्या दरवाजातून आत गेल्यावर डोंगराच्या पोटात 2 मोठी टाकी आढळतात. इथूनच डावीकडची भिंत चढून गेल्यावर वर नमूद केलेला देवनागरी लिपीमधील 4 फूट संस्कृत शिलालेख आपल्या नजरेस पडतो. हा शिलालेख महाराष्ट्रातील किल्ल्यांवर सापडणाऱ्या संस्कृत शिलालेखात सर्वात मोठा शिलालेख आहे.
शिलालेख पाहून गडाच्या चौथ्या दरवाजातून आत गेल्यावर डावीकडील कातळावर हनुमान आणि समोर गुहा दिसतात. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडे जाणारा मार्ग एका पडक्या दरवाजातून आपल्याला भक्कम तटबंदीने नटलेल्या माचीकडे घेऊन जातो. इथे पाण्याचं मोठ टाकं आणि तटांत लपलेला चोर दरवाजा दिसतो. दुर्दैवाने चोर दरवाजाकडे जाणारा मार्ग झाडीत हरवला आहे.
उजवीकडे पायऱ्यांची वात आपल्याला गडदेवता हटकेश्वर महादेवाच्या मंदिराकडे घेऊन जाते. तिथेच एक पाण्याचं टाकं आहे. समोरच एक बुरूजवजा कोठार नजरेस पडते. त्यासमोरच एक दारू कोठार आहे. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात अनेक अवशेष आहेत आणि 4 मोठी टाकी आपल्या नजरेस पडतात. किल्ल्याच्या माथ्यावरून सभोवतालच्या प्रदेशावर नजर टाकली तर अचला, अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंडय़ा, रवळ्या-जवळ्या, धोडप, इखारा, भिलई, सालोटा, साल्हेर, न्हावी रतनगड हे किल्ले स्पष्ट दिसतात. गडफेरीला साधारण तासभर लागतो. तसेच खाली गावात उतरल्यावर कमान असलेली इमारत, बारव आणि चुन्याचा घाणा असे अवशेष दिसतात.
भक्कम तटाने नटलेला हा छोटेखानी किल्ला दूरवरून उठून दिसतो. इतिहास, अवशेष आणि दुर्गस्थापत्याने नटलेला हा दुर्ग नाशिकला गेल्यावर नक्कीच पाहिला पाहिजे!


























































