
>> प्रसाद ताम्हनकर
काही काळापूर्वी वापरायला कठीण असलेले आणि काहीसे महागडे असलेले डीपफेक तंत्रज्ञान आता प्रत्येकाला सहजपणे उपलब्ध झाले आहे आणि ही जगभरात चिंतेची गोष्ट बनलेली आहे. विनोद अथवा थट्टा म्हणून एकेकाळी निर्माण होत असलेले असे व्हिडीओ आता एखाद्या राजकारणी, खेळाडू अथवा अभिनेत्याची बदनामी करण्यासाठी वापरण्यास सुरुवात झालेली आहे.
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला गैरवर्तन अथवा एखादे अश्लील कृत्य करताना दाखवणे, एखाद्या राजकारणी व्यक्तीला त्याने कधी उच्चारलेदेखील नाही असे वाक्य बोलताना दाखवणे, एखाद्या अभिनेत्रीचा चेहरा वापरून तिचे विवस्त्र फोटो तयार करणे असे गैरप्रकार जगभर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जगातील सर्व लहानमोठय़ा देशांच्या तपास यंत्रणेसाठी हे एक आव्हान बनलेले आहे. जगातील सर्व देश या समस्येशी कसे लढावे याचा विचार करत असताना डेन्मार्क देशाने यासंदर्भात आपल्या कॉपीराइट कायद्यात बदल करण्याचा आणि या समस्येच्या मुळावर घाव घालण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कायद्यामधील हे नवे बदल अजून संमत झाले नसले तरी या नव्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या चेहऱयाचा अथवा आवाजाचा गैरवापर झाल्याचे उघडकीला आल्यास सदर व्यक्ती असा व्हिडीओ अथवा आवाजाची क्लिप त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढण्यास भाग पाडू शकते, सदर कंपनी आणि एआय टूलचा वापर करणाऱया व्यक्तीविरोधात खटला दाखल करू शकेल आणि नुकसान भरपाईची मागणीदेखील करता येणार आहे.
पूर्वी एखादे पेंटिंग किंवा कथा, कविता यासाठी कॉपीराइट कायदा तयार करण्यात आला होता. ज्यामुळे एखाद्या पेंटिंगची नक्कल होणे, कथा कल्पना चोरीला जाणे यापासून कायदेशीर संरक्षण मिळत असे. पुढे संगीताच्या बाबतीत मोठय़ा प्रमाणावर शब्द, चाली, संगीत अशा चोरीच्या घटना वाढल्यावर त्यालादेखील कॉपीराइट कायद्याचे संरक्षण मिळाले आणि त्या काळात सामान्य माणसाला ‘कॉपीराइट’ हा शब्द खऱया अर्थाने परिचित झाला. येणाऱया नव्या कायद्याविषयी अनेक लोक सकारात्मक असताना काही तज्ञांनी डीपफेक प्रकरणात होणाऱया गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या कायद्याची कितपत मदत होईल याविषयी शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या मतानुसार हा कायदा राबविण्यात सर्वात मोठी अडचण ही असणार आहे की, जगात लोकप्रिय असलेले जवळपास सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे आंतरराष्ट्रीय आहेत. अर्थात या कायद्याच्या सुयोग्य अंमलबजावणीसाठी अनेक देशांना हा कायदा आपल्या देशात लागू करावा लागेल. सध्या काही देशांनी आधुनिक तंत्रज्ञानासह कॉपीराइट कायदादेखील एकत्रितपणे लागू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र प्रत्येक देशात त्याचा स्वतचा एक वेगळा कॉपीराइट कायदा असताना नव्या कायद्याची अंमलबजावणी करणे सुलभ असेल का? हा खरा प्रश्न आहे.
कॉपीराइट कायदा हा मुख्यत रचनात्मक गोष्टींसाठी लागू होतो. साहित्य, चित्रकला, संगीत या गोष्टींचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. माणूस हा जन्मत एक चेहरेपट्टी घेऊन आलेला असतो. अशा वेळी त्याची रचना नसलेला चेहरादेखील कॉपीराइट कायद्याचा संरक्षणात आणणे काहीसे विचित्र असल्याची टीकादेखील काही टीकाकारांनी केली आहे. मात्र आपल्या समोर जे काही चित्र किंवा व्हिडीओ येतो आहे तो खरा आहे की तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविलेला खोटा व्हिडीओ आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे आणि त्या हक्काचे रक्षण व्हायला हवे या मुद्दय़ावर मात्र सर्व बाजूंचे एकमत आहे. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर होत असलेला आपला देश यासंदर्भात काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असणार आहे.