
वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रभात कुमार आणि प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती देण्यात आली, तर अन्य चार अपर पोलीस महासंचालकांच्या बदलीचे आदेश आज गृह विभागाने जारी केले.
नागरी संरक्षण दलाचे संचालक व अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांना आज महासंचालकपदी बढती देण्यात आली. बढती देऊन त्यांना त्याच ठिकाणी पद उन्नत करून कायम ठेवण्यात आले. तर गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती देऊन त्यांच्याकडे लोहमार्ग पोलीस दलाची धुरा सोपविण्यात आली आहे. याशिवाय चार अपर पोलीस महासंचालकांच्या बदल्या करण्यात आल्या.
बदल्या पुढीलप्रमाणे
राज्याच्या नियोजन व समन्वय विभागाचे अपर महासंचालक सुनील रामानंद यांच्याकडे गुन्हे अन्वेषण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजकुमार व्हटकर हे आता राज्य राखीव पोलीस बल विभागाचे अपर महासंचालक म्हणून काम पाहतील. के. एम. प्रसन्ना हे प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर महासंचालक असतील तसेच प्रवीण साळुंखे यांच्याकडे राज्याच्या महामार्ग पोलीस विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.