प्रताप सरनाईकांनी एसटी कर्मचाऱ्यांना गंडवले; पगार पुन्हा लटकवला

मिंधे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना साफ गंडवले. कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला देऊ, असे आश्वासन सरनाईकांनी दिले होते. मात्र जुलैची 7 तारीख उलटून गेली तरी सायंकाळपर्यंत जूनच्या पगाराचा जीआर काढलेला नाही. त्यामुळे राज्यातील 86 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा पगार लटकला असून सरकारविरोधात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूश करण्यासाठी सरकारने सवलतीच्या योजनांची घोषणा केली. मात्र सध्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे त्या योजना सुरू ठेवताना सरकारची दमछाक होत आहे. त्याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसला आहे. एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांचा निम्मा पगार कापला. त्याविरोधात तीव्र पडसाद उमटताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापुढे कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक महिन्याच्या सात तारखेलाच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळवून देऊ, त्यासाङ्गी वित्त विभागाच्या कार्यालयात मी पाच तारखेलाच हजेरी लावेन, असे आश्वासन दिले होते. सरनाईक यांनी दोन महिन्यांत त्या आश्वासनावर पाणी फेरले आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची रखडपट्टी सुरू झाली. जून महिन्याचा पगार एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारी 7 तारखेला मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यानुसार पगार खात्यात जमा झाला नाही. किंबहुना सायंकाळपर्यंत पगाराचा जीआरही काढला नाही. त्यामुळे सरनाईक यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक केल्याचे उघड झाल्याने त्यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

404 कोटींच्या प्रस्तावावर 15 दिवस निर्णय नाही

एसटी महामंडळाने मे महिन्यातील विविध सवलतींच्या मूल्यापोटी सरकारकडे 404 कोटी 26 लाख 84 हजार 458 रुपयांची मागणी केली आहे. महामंडळाने याचा प्रस्ताव 24 जून रोजी सरकारकडे पाङ्गवला आहे. तो प्रस्ताव मागील 15 दिवस सरकारकडेच पडून आहे. संबंधित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांचा पगार काढला जाणार आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसाठी एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पह्न कॉलला प्रतिसाद दिला नाही.

कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता

एसटी महामंडळाच्या प्रस्तावावर सरकारने जीआर काढल्यानंतर दोन दिवसांनी पगार खात्यात जमा होतो. मात्र 7 तारीख उलटूनही पगाराचा जीआर काढलेला नाही. त्यामुळे जीआर कधी काढला जाईल? पगार वेळेत होईल का? पगार पुन्हा कापणार की काय? आदी प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना सतावत आहेत. परिवहन मंत्री सरनाईक आणि फडणवीस सरकारच्या भूमिकेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पगार वेळेत झाला नाही तर कर्जाचे हप्ते कसे भरणार, अशी चिंता कर्मचाऱ्यांना सतावत आहे. दरम्यान, सरकारने दोन दिवसांत जीआर काढला तरी 10 जुलैनंतरच पगार खात्यात जमा होऊ शकतो, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली.