
मंगळवारी सायंकाळी मुंबईसह राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढणारा मान्सूनपूर्व पाऊस आणखी तीन दिवस धडकी भरवणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने काही जिह्यांना ‘रेड’ तर अनेक जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. कोकण किनारपट्टी भागात ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांसह सर्वच नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
मागील आठवडाभर राज्यात उकाडा प्रचंड वाढला होता. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. अशातच मंगळवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणासह राज्याच्या अनेक भागांना तर अक्षरशः झोडपून काढले. बुधवारी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली. मात्र गुरुवारपासून आणखी तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी आणि अरबी समुद्राजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याचा परिणाम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. कोकण किनारपट्टी भागात ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वादळी वारे, विजांसह पाऊस कोसळणार
मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल. शनिवारपर्यंत पावसाचा जोर वाढताच राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
24 तासांत सिंधुदुर्गात सर्वाधिक पाऊस
मंगळवारी सायंकाळपासून रात्रभर पावसाने राज्याच्या अनेक भागांत धुमशान घातले. इतर जिह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात जास्त पाऊस पडला. जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात मागील 24 तासांत सर्वाधिक 130 मिमी पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ वातावरणात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे त्याचा कोकण किनारपट्टी परिसरात अधिक प्रभाव जाणवला.
राज्यात शनिवारपर्यंत पडणारा पाऊस हा वळवाचा पाऊस असेल. या पावसाला मोसमी पाऊस म्हणता येणार नाही. मान्सूनपूर्व पावसाने विश्रांती घेताच पुढील काही दिवस तापमानात पुन्हा मोठी वाढ होईल, असे हवामानतज्ञांनी म्हटले आहे. मुंबई, ठाण्याच्या तापमानातही वाढ होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.