
मुंबई विभागातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकचे वर्ग सकाळी नऊ वाजण्यापूर्वीच सुरू होत आहेत. राज्यपाल रमेश बैस यांनी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक पर्यंतच्या शाळा सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर सुरू करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला दिली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांसाठी तशा लेखी सूचनाही जारी केल्या होत्या. मात्र शिक्षण विभागाच्या सूचनेला अनेक शाळांनी केराची टोपली दाखविली आहे.
लहान बालकांना पूर्ण झोप मिळावी, त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात पार पडलेल्या शिक्षण विभागाच्या कार्यक्रमात प्राथमिक शाळा या सकाळी 9 किंवा त्यानंतर भरविण्यात येतील का, याबाबत विचार करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने 8 फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी करून सकाळी 9 पूर्वी भरणाऱया राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. स्थानिक परिस्थितीचा विचार करून शाळांच्या वेळेत बदल करण्यात यावा, हा बदल करताना अध्ययन व अध्यापनाचा कालावधी कमी होणार नाही, याची काळजी घेण्याचेही शिक्षण विभागाने म्हटले होते. मात्र शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील शाळा सुरू झाल्या तरीही शाळांच्या वेळेत बदल झालेला नाही, असा आरोप प्रयास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अॅड. सागर देवरे यांनी केला आहे.
प्राथमिक शाळा सकाळी 9 किंवा 9 नंतर सुरू करण्यात यावी, ही राज्य सरकारची घोषणा हवेतच विरली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही शिक्षण विभागाच्या सूचनांचे शाळा पालन करताना दिसत नाहीत. अनेक प्राथमिक शाळा सकाळी 9 आधीच सुरू होत आहे. सकाळी शाळेत जाताना विद्यार्थ्यांची दमछाक होत असून शिक्षण विभागाने शाळेच्या वेळेबाबत केलेल्या सूचनांचे तंतोतत पालन होत आहे का याची तपासणी करावी.
n अॅड. सागर देवरे, अध्यक्ष, प्रयास