प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प…थोडा देशाभिमान उधार मिळेल काय?

56

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आम्ही शंभर गुण देत आहोत. त्यांनी जगाची पर्वा न करता आपल्या देशाची फिकीर केली आहे. आमचे पंतप्रधान लवकरच अमेरिकेत जातील. तशी तयारीही सुरू असेल. कारण हिंदुस्थानातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार केल्यामुळेच अमेरिकेत ट्रम्प जिंकले. नाहीतर त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले असते. ट्रम्प यांच्याकडून थोडी हिंमत, थोडा देशाभिमान व चिमूटभर प्रामाणिकपणा उधार मिळत असेल तर पहा.

प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प थोडा देशाभिमान  उधार मिळेल काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा महिमा काय वर्णावा! त्यांच्यासारखे तेच. ट्रम्प हे अध्यक्ष होताच त्यांची खिल्ली अनेकांनी उडवली. आम्हीही म्हणालो होतो की, ट्रम्प जे निवडणुकीआधी बोलले ते करून दाखवतील काय? पण ट्रम्प यांनी करून दाखवायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या बाबतीत त्यांनी कठोर निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांच्या दहशतवादविरोधी प्रतिबंधक योजनेनुसार पाकिस्तानातून अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांची दहशतवादी समजून कसून चौकशी केल्यानंतरच त्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे. तसे आदेश अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जारी करून आपल्या कणखरपणाची चुणूक दाखवली आहे. ट्रम्प यांनी सात ‘इस्लामी देशांतील निर्वासितांच्या अमेरिकेतील प्रवेशबंदी आदेशावर मोहोर उठवली आहे.’ अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेसाठीच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानातून जगभरात दहशतवादाचा पुरवठा होतो हे आता उघड सत्य आहे. त्यामुळे अमेरिकेने आपल्यापुरता हा निर्णय घेऊन पाकिस्तानला अप्रत्यक्ष दहशतवादी राष्ट्र घोषित करून टाकले आहे. ज्या राष्ट्राला ट्रम्पसारखा राष्ट्राध्यक्ष मिळाला त्या राष्ट्रात पाकडय़ा दहशतवाद्यांचे चिटपाखरूही घुसणार नाही. या निर्णयापासून धडा घ्यायचा आहे तो हिंदुस्थानी राज्यकर्त्यांनी.

पाकिस्तानच्या बाबतीत आमचे दिल्लीश्वर आजही चाचपडत बसले आहेत. पाकिस्तानात घुसून अमेरिकन कमांडोजनी लादेनला ठार करून पाताळात सोडले तरी आमचे राज्यकर्ते दाऊदला फरफटत ओढून आणण्याच्या माकडउड्या मारीत आहेत. पाकिस्तानचे करायचे काय या भ्रमातून सध्याचे मोदी सरकारही बाहेर पडू शकलेले नाही. वास्तविक या सरकारनेही पाकड्यांवर कठोर निर्बंध लादून व्यापार, कला, क्रीडा या बाबतीत त्यांची कोंडीच करायला हवी होती. कारण कश्मीर खोऱ्यातील त्यांचा दहशतवाद संपलेला नाही व हिंदुस्थानचे तुकडे पाडण्याचे त्यांचे मनसुबे अटळ आहेत. हिंदुस्थान हे इस्लामी राष्ट्र बनविण्यासाठी एक षड्यंत्र रचले जात आहे. त्यामागची प्रेरणा पाकडय़ांचीच आहे, पण पाकच्या बाबतीत आपला बोटचेपेपणा संपलेला नाही. उलट काँग्रेस राजवटीपेक्षा तो जरा जास्तच वाढला आहे. पाकडय़ा कलाकारांसाठी पायघडय़ाच घातल्या जात आहेत. हे सर्व कलाकार उद्या अमेरिकेच्या विमानतळावर उतरतील तेव्हा त्यांना रोखले जाईल, दहशतवाद्यांप्रमाणे त्यांची चौकशी केली जाईल हे आमच्या हिंदी सिनेसृष्टीतील खानावळीने लक्षात घेतले पाहिजे. पाकड्यांच्या बाबतीत जे मोदी सरकारने करायला हवे होते ते ट्रम्प यांनी एका झटक्यात करून दाखवले.

मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री नोटाबंदीचा निर्णय घेऊन जो हाहाकार माजवला त्यामुळे देशातील सामान्य जनता चोर, गुन्हेगार, दहशतवादी ठरवली गेली, पण ‘नोटा बंदी’ऐवजी मोदी यांनी ट्रम्पप्रमाणे पाकिस्तानवर बंदी घातल्याचा निर्णय जाहीर केला असता तर देशाने त्यांना डोक्यावर घेतले असते. पण पाकिस्तानच्या बाबतीत कठोर निर्णय घेतला तर येथील मुसलमानांना राग येईल व उत्तर प्रदेशातील निवडणुकीत ‘सेक्युलर’ प्रतिमेस धक्का बसेल असे भाजप सरकारला वाटले असावे. राष्ट्रीय सुरक्षेचा व खासकरून पाकिस्तानबाबतचा निर्णय राजकीय फायदे-तोटे लक्षात घेऊन करू नये. देश टिकला तर राजकारण टिकेल हे आमचे मत आहे व राहणारच. हिंदुस्थानातील अनेक फिल्मी ‘खान’ मंडळींना अमेरिकेच्या विमानतळावर आठ-आठ तास रोखून जेव्हा त्यांची दहशतवाद्यांप्रमाणे झडती घेतली जाते तेव्हा त्या गोष्टीचा आम्हालाही संताप येतो, पण हेच ‘खान’ मंडळ दहशतवादी पाकिस्तानातील कलाकारांना आपल्या चित्रपटांत घेऊन जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करीत असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आम्ही शंभर गुण देत आहोत. त्यांनी जगाची पर्वा न करता आपल्या देशाची फिकीर केली आहे. आमचे पंतप्रधान लवकरच अमेरिकेत जातील. तशी तयारीही सुरू असेल. कारण हिंदुस्थानातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार केल्यामुळेच अमेरिकेत ट्रम्प जिंकले. नाहीतर त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले असते. ट्रम्प यांच्याकडून थोडी हिंमत, थोडा देशाभिमान व चिमूटभर प्रामाणिकपणा उधार मिळत असेल तर पहा.

 

आपली प्रतिक्रिया द्या