सतीश आळेकर यांना प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’

नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’ पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, अभिनेते सतीश आळेकर यांना जाहीर झाला. 10 मार्च रोजी प्रतिष्ठानच्या गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचे वितरण केले जाईल. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार-पत्रकार कुमार केतकर, कुसुमाग्रज फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी सतीश आळेकर यांच्या नावाची घोषणा केली.  मागील 3 दशकांहून अधिक काळ आळेकर यांनी रंगभूमीसाठी महत्त्वाचे योगदान दिले. महानिर्वाण (1974), महापूर (1975), अतिरेकी (1990), पिडीजात (2003), मिकीमाऊस आणि मेमसाहिब (1973) आणि बेगम बर्वे (1979) ही नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. महेश एलपुंचवार आणि विजय तेंडुलकर यांच्यासमवेत ते आधुनिक मराठी आणि हिंदुस्थानी रंगभूमीवरील सर्वात प्रभावशाली आणि प्रगतीशील नाटककार मानले जातात. सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाटय़प्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले.