
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, जनता भाजपसोबत नसून द्रमुक (DMK) आणि काँग्रेसच्या बाजूने आहे. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आणि द्रमुकची युती विजय मिळवून आघाडीचे सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला. “पंतप्रधान स्वप्न पाहत आहेत, आम्ही स्वप्न पाहत नाही. आमची निवडणूक स्थिती अत्यंत मजबूत आहे,” असे खरगे यावेळी म्हणाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी येथे आयोजित जाहीर सभेत खरगे यांनी सत्ताधारी ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस (AINRC) आणि भाजपवर केंद्रशासित प्रदेशाची लूट केल्याचा गंभीर आरोप केला. पुद्दुचेरीमध्ये नायब राज्यपाल सरकारी कामकाजात हस्तक्षेप करत असल्यामुळे या प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
मोदींनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आश्वासन दिले होते, मात्र सध्या ३० टक्के कमिशनचे सरकार चालत असून सर्व काही अदानींच्या घशात घातले जात असल्याची टीका त्यांनी केली. तसेच पुद्दुचेरीमध्ये ४५० मद्यविक्रीची दुकाने उघडल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त करत, जनतेला शुद्ध पाणी देण्याऐवजी सरकार दारू देत असून यामुळे ड्रग्ज माफिया आणि अंमली पदार्थांचे व्यसन वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला.


























































