
एकीकडे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या प्रोफेसर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने हरिभंगा जातीचे तब्बल एक हजार किलो आंबे हिंदुस्थानात पाठवले आहेत. दोन्ही देशांतील व्यापारी तसेच संरक्षणविषयक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने बांगलादेशकडून या मँगो डिप्लोमसीचा वापर करण्यात येत असून बांगलादेशच्या हिंदुस्थानी दूतावासातील अधिकाऱ्यांसाठी ही गोड भेट पाठवण्यात आली आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केंद्र सरकारसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनाही हरिभंगा जातीचे आंबे पाठवले आहेत. तब्बल 300 किलो आंबे 60 डब्यांमध्ये पॅक करून गेल्या आठवडय़ात गुरुवारी पाठवले.
का खास आहेत हरिभंगा आंबे?
कोकणातील हापूसप्रमाणे बांगलादेशातील हरिभंगा हे खास आणि अतिशय उत्तम दर्जाचे आंबे म्हणून गणले जातात. हिंदुस्थानातही हे आंबे लोकप्रिय आहेत. हे आंबे दिनापूरमध्ये पिकतात. या आंब्यांमध्ये धागे किंवा नुसत्याच गुठळ्या नसतात. त्यांची साल जाड असते. एका आंब्याचे वजन 300 ते 400 ग्रॅम असते. अनेक दिवस हे आंबे खराब होत नाहीत. हे आंबे खूप गोड आणि रसाळ असतात. तसेच इतर जातींच्या आंब्यांच्या तुलनेत हे आंबे महाग असतात.
आंबे पाठवण्याची बांगलादेशची जुनी परंपरा
बांगलादेशातून हिंदुस्थानात हरिभंगा जातीचे आंबे पाठवण्याची परंपरा जुनी आहे. याआधीच्या सरकारांनीही अशा प्रकारे आंबे पाठवले आहेत. या वेळी मात्र युनुस सरकारने आंबे खास कारणासाठी पाठवले आहेत. गेल्या वर्षी विद्यार्थांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवावे लागले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि बांगलादेशमध्ये दरी निर्माण झाली होती. त्यामुळे आंबे पाठवण्याची ही परंपरा पुढेही कायम राहाणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.