
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते व मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
महाराष्ट्रहिताशी कधीही तडजोड नाही!
बाळासाहेबांनी आपले ठाम विचार आणि निर्भीड ठाकरी बाणा जपताना महाराष्ट्रहिताशी कधीही तडजोड केली नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुखांचे स्मरण केले. बाळासाहेबांनी शब्दांची निवड करताना कधी मागेपुढे पाहिले नाही. विविध विषयांवर संघर्ष जरी झाला तरी आपली भूमिका कधी त्यांनी लपवून ठेवली नाही हे त्यांचे वैशिष्टय़ होते. राजकारणात विरोध असू शकतो, पण वैयक्तिक कटुता नसावी, हा संस्कार घालून देणारे रोखठोक व मार्मिक भाष्यकार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, अशा भावना शरद पवार यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये व्यक्त केल्या.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व, ठाम विचारसरणी!
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेशी अद्वितीय नाते जपले. राजकारणाबरोबरच त्यांना संस्पृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकीर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. बाळासाहेबांचा महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव राहिला. या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये नमूद केले आहे.
मान्यवरांनी केले वंदन
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरी बापू कमभमपती, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार शत्रुघ्न सिन्हा, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केले.






























































