
>> प्रा. समीर जाधव, [email protected]
तंजावरची साहित्य संस्कृती बहरण्यात महत्त्वपूर्ण योगदान असणारे प्रतापसिंहराजे भोसले, ज्यांचा लष्करी मोहिमांसोबत मराठी नाटय़लेखनातही ठसा उमटलेला दिसून येतो.
सिदोजीराजे, तुलाजीराजे, तुकाजीराजे व सुब्बा चेट्टी यांनी सुजानबाईंच्या विरोधात जाऊन एका तोतयाला तंजावरच्या गादीवर बसवले. परंतु तोतयाचे राज्य फार काळ टिकले नाही. पुढे तुकोजीराजे यांना अन्नपूर्णा या मराठा खांडराणीपासून झालेल्या मुलाला तंजावरच्या गादीवर बसवले. तो मुलगा म्हणजे प्रतापसिंहराजे भोसले होय. प्रतापसिंहराजांनी स्वतःच्या मनाविरुद्ध तंजावरचे राजेपद स्वीकारले होते. त्यांनी इ. स. 1740 ते 1760 पर्यंत तंजावरवर राज्य केले. प्रतापसिंहराजे शूर, बलवान व देखणे होते. त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द इंग्रज आणि फ्रेंच यांच्याशी डावपेच करण्यातच गेली. तंजावरमधील अराजकता दूर करण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली.
प्रतापसिंहराजांनी साताऱयाचे छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले. कर्नाटकच्या नवाबाच्या विरोधात साताऱयाहून फौजेची मुख्य मदत मागवली. छत्रपती शाहू महाराजांनी फतेहसिंगराव व रघुजी भोसले यांच्या हाताखाली एक मजबूत फौज दक्षिणेकडे पाठवली. त्यांनी चांदसाहेबाला पकडून साताऱयाला बंदिवान म्हणून नेले. या फौजेशी लढत असताना कर्नाटकचा नवाब दोस्तअल्ली हा मारला गेला. रघुजी भोसले यांना संपूर्ण दक्षिण हिंदुस्थान जिंकण्याची महत्त्वाकांक्षा होती. असे घडल्यास आपणही साताऱयाच्या छत्रपतींचे मांडलिक होऊ असे प्रतापसिंहांना वाटले म्हणून फतेहसिंगराव व रघुजी भोसलेंकडून चांदसाहेबाच्या प्रदेशाची म्हणजे त्रिचनापल्लीची देणगीही अविचारीपणे नाकारली. ज्याप्रमाणे प्रतापसिंह यांचे आजोबा व्यंकोजी (पहिला) यांनी दख्खनच्या आणि कर्नाटकच्या नवाबाकडील दक्षिणेकडील प्रदेशावर हिंदू राजवट प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे केलेला मैत्रीचा हात नाकारला होता, त्याचप्रमाणे प्रतापसिंहराजांनी रघुजी भोसले यांना मदत केली नाही. त्यामुळे प्रतापसिंहराजांनी आपल्या राज्याचा विस्तार करण्याची संधी गमावली. शेवटी फतेहसिंगराव व रघुजी भोसले यांनी गुटीचा लुटारू राजा मुरारीरावला त्रिचनापल्ली दिली. पुढे कर्नाटकच्या नवाबाने ही त्रिचनापल्ली सर केली आणि अन्वरुद्दीनला दिली. तसेच तंजावरवर काही खंडणीही लादली. ती प्रतापसिंहराजांना मान्य करणे भाग पडले.
निजाम, नवाब, मराठे आणि परदेशी व्यापारी यांमध्ये कशा प्रकारचे संबंध राहतील या परिस्थितीचा अंदाज प्रतापसिंहराजांना करता आला नाही म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द काहीशी अस्थिर स्वरूपाची राहिली. इ. स. 1747 साली तोतया कट्टूराजाने इंग्रजांना मोठय़ा देणगीचे आमिष दाखवून त्यांच्या मदतीने तंजावर काबीज करण्याचा आणखी एक प्रयत्न केला. यावेळी झालेल्या युद्धात तोतया परभूत झाला.अशा तंजावरमधील राजकीय अस्थिरतेतून मार्ग काढत राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न त्यांनी केले.
लष्करी कारवाईत व्यस्त असतानासुद्धा प्रतापसिंहराजांनी आपल्या राजवटीत साहित्यादी कलांची जोपासना केली. त्यांच्या दरबारात संस्कृत, तामीळ, तेलुगू आणि मराठी या भाषांमधील विद्वान पंडितांची गर्दी होती. त्यांनी विविध विषयांवर संस्कृत व मराठी भाषेत पुराणे, नाटकादींची निर्मिती केली. प्रतापसिंहअनेक मराठी नाटकं लिहीली. या नाटकांपैकी ‘प्रभावतीपरिणय’ हे नाटक-गर्भनाटक स्वरूपाचे नाटक असून ते मराठीतले पहिले नाटक-गर्भनाटक ठरते. त्याचबरोबर ‘जानकीसुखोल्लास’ हे तामीळनाडूमध्ये प्रचलित असलेल्या कोरवंजी नामक लोकनृत्य-नाटय़प्रकारातले नाटक लिहिले. प्रतापसिंह केवळ लष्करी रणनीतीकार नव्हते तर ते प्रयोगशील नाटककार आणि विद्वानही होते.
त्यांनी पट्टुकोट्टईजवळ एक अग्रहरम बांधले. त्याला उमांबापुरम असे आपल्या आईचे नाव दिले. अग्रहरमच्या रहिवाशांसाठी 4000 एकर जमीन दिली. नागोर दर्गा येथे एक मिनारही बांधली. जगन्नाथ बाळकृष्ण, तिप्पण त्र्यंबक भट, महादेवसुत, रामनाथ, रामकृष्ण कवी असे कवी कलावंत प्रतापसिंह यांच्या राजदरबारी आश्रयास होतेच त्याचबरोबर त्याकाळातील एक अत्यंत प्रतिभावान नर्तकी मुद्दूपलानी हीसुद्धा प्रतापसिंह यांच्या दरबारात होती. भरतनाटय़ात पारंगत असलेल्या या तेलुगू भाषेतील विदुषीने ‘राधिका संतवानमू’ हा काव्यग्रंथ लिहिला. प्रतापसिंह एक महान रसिक, तसेच कला, साहित्य, कवी आणि संगीतकार या सर्वांचे उदार आश्रयदाते होते, हे तिच्या ‘राधिका संतवानमू’ ग्रंथाच्या समारोपावरून स्पष्ट होते. प्रतापसिंहांचे 16 डिसेंबर 1763 रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र तुळजाजी (दुसरा) हे तंजावरचे राजे झाले. प्रतापसिंहांच्या कलाक्षेत्रातील वाखाणण्याजोग्या कामाचा आढावा पुढील लेखात घेऊ.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)



























































