
पक्षपाती वर्तन, विरोधी महिला खासदारांबद्दल निराधार वक्तव्य आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना महत्त्वाच्या विषयावर बोलू न देण्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी ओम बिर्ला यांच्या पक्षपाताचे दाखले देतानाच केंद्र सरकारवरही जोरदार हल्ला चढवला.
लोकसभा अध्यक्ष हे तटस्थ असणे अपेक्षित असते. अध्यक्ष हे स्वातंत्र्याचे व सभागृहाच्या प्रतिष्ठेचे प्रतीक असते. पण या सभागृहात अभिव्यक्ती स्वातंत्र्य उरले आहे का, असा सवाल काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केला. राहुल गांधी यांना 20 वेळा बोलण्यापासून रोखले गेले, असा दावाही गोगोई यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांनीही प्रस्तावाला पाठिंबा देत अध्यक्षांच्या कामकाजाच्या पद्धतीवर टीका केली. ही चर्चा उद्यापर्यंत चालणार असून त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उत्तर देणार आहेत.
सरकारला सत्य पचत नाही! – प्रियांका गांधी
प्रियांका गांधी यांनीही सरकारला धारेवर धरले. ’राहुल गांधी ही एकच व्यक्ती आहे, जी गेल्या 12 वर्षात सरकारपुढे झुकली नाही. ते सभागृहात उभे राहून सत्य सांगतात. ते सत्य सरकारला पचत नाही. त्यामुळे त्यांना बोलू दिले जात नाही,’ असा हल्ला प्रियंका यांनी चढवला.
अधिकार म्हणजे मनमर्जी नव्हे – अरविंद सावंत
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना खणखणीत मुद्दे मांडले. ’लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब नाही. मात्र आमचा नाईलाज का झाला याचा विचार संबंधितांनी करायला हवा. अध्यक्षांचे अधिकार आम्हाला मान्य आहेत. आम्ही त्यांचा सन्मान करतो. मात्र ते अधिकार म्हणजे ’माझी मर्जी’, ’मन की बात’ असे होत नाही,’ असा टोला सावंत यांनी हाणला. विरोधक सभागृहाचा वेळ वाया घालवत असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आरोपांचाही सावंत यांनी समाचार घेतला.





























































