ठेकेदारांना पोसण्यासाठी सरकारकडून ‘शक्तीपीठ’चा घाट! गडहिंग्लज येथे सर्वपक्षीयांचा रास्ता रोको, संकेश्वर-बांदा महामार्ग रोखला

सरकार करू पाहत असलेला शक्तिपीठ महामार्ग म्हणजे विनाकारण राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आर्थिक बोजा टाकण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून या रस्त्याच्या माध्यमातून ठेकेदारांना पोसून त्यातून पैसे काढण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे भूमिपुत्राला संकटात टाकणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी व जनतेने एकजुटीने विरोध करण्याची गरज आहे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी गडहिंग्लज येथे रास्ता रोको आंदोलनादरम्यान केले.

गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून शक्तिपीठ महामार्गाची मागणी करणाऱ्या चंदगडच्या आमदारांनी या विभागातील ठेकेदारांची सरकारकडे थकीत असणारी बिले मिळावीत यासाठी आवाज उठवावा, असा सल्लादेखील त्यांनी दिला. या सर्वपक्षीय आंदोलनात महायुतीतील काही नेते मंडळींनी सहभाग घेत या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवत सरकारला घरचा आहेर दिला.

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग विरोधात गडहिंग्लज येथील दसरा चौकात विविध पक्ष व संघटनांनी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी काही काळ ठिय्या मारल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस प्रशासनाने या आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा, नद्यांवर पूल उभारून येथील जनतेला महापुरात लोटणारा, इथली जंगले व पर्यावरण नष्ट करणारा शक्तिपीठ महामार्ग कायमचा हाकलून लावण्याची प्रतिज्ञा सर्व पदाधिकाऱ्यांनी करत या विरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार केला.

या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई, जनता दलाचे प्रा. स्वाती कोरी, बाळेश नाईक, मनसेचे नागेश चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, भाजपचे संग्रामसिंह कुपेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, स्वाभिमानीचे राजेंद्र गडयानावर, सम्राट मोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जयसिंग चव्हाण आदींची भाषणे झाली.

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख रियाजभाई शमनजी, तालुकाप्रमुख अजित खोत, वसंत नाईक, युवासेनेचे जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, श्रीशैल साखरे, काँग्रेसचे दिग्विजय कुराडे, युवराज बरगे, अंजना रेडेकर, रामदास कुराडे, दयानंद पट्टणकुडी, शिवाजी होडगे, शिवप्रसाद तेली, प्रकाश पाटील, बाळासाहेब गुरव यांच्यासह विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव – राजेश पाटील

माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्ग म्हणजे लॉजिक नसलेले लॉजिस्टिक, पर्यटन व रोजगाराच्या नावाखाली काळ्या आईची देखभाल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून रस्ता करण्याचा हा डाव आहे. मात्र, येथील शेतकरी व जनता एकजुटीने हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडेल’, असा इशारा त्यांनी दिला.

…तर तुमच्या नरडय़ावर आम्ही उभे राहू – प्रा. सुनील शिंत्रे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, ‘येथील शेतकरी व जनता आधीच महापुराने भरडली आहे. आता पुन्हा या शक्तिपीठ महामार्गामुळे येथील शेती बुडणार आहे. 86 हजार कोटी खर्च करणाऱ्या सरकारने केवळ 86 कोटी दिले तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे रस्ते चांगले होतील. शेतकऱ्यांच्या नरडय़ावरून जाणार असाल तर तुमच्या नरडय़ावर आम्ही उभे राहिल्याशिवाय राहणार नाही’, असा खणखणीत इशारा प्रा. शिंत्रे यांनी सरकारला दिला.

‘शक्तीपीठ’वर 86 हजार कोटींची उधळपट्टी – राजू शेट्टी

माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्ग हा अव्यवहार्य आहे. सध्या शासनाकडे 90 हजार कोटींची ठेकेदारांची बिले थकीत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन-चार महिन्यांचे पगार देखील थकलेत. रोजगार हमीच्या मजुरांना देखील अद्याप पैसे मिळालेले नाहीत, अशी परिस्थिती राज्याची असताना 86 हजार कोटी खर्च करून हा नवा रस्ता करण्याची काय गरज आहे’, असा सवाल त्यांनी केला.