डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, शिक्षणमंत्री राजीनामा द्या! मराठीप्रेमींचा आझाद मैदानात एल्गार

शालेय शिक्षणात तिसरी भाषा लागू करण्यासंदर्भात शासनाने नेमलेली डॉ. नरेंद्र जाधव समिती तत्काळ बरखास्त करावी, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांचे राजीनामे घ्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी मराठीप्रेमींनी एल्गार पुकारला. आज आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. तिसऱ्या भाषेविरुद्धचा लढा सुरूच राहणार असा निर्धार यावेळी करण्यात आला.

शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीने या एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. नागरी संस्था-संघटनांव्यतिरिक्त या आंदोलनात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, यशोमती ठाकूर, भारतीय समाजवादी पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, मनसेचे हेमंतकुमार कांबळे, कॉ. शैलेंद्र कांबळे, प्रभाकर नारकर तसेच सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीत हे कलाकार त्यांच्या दिया आणि नीरद या आपल्या मुलांसह उपस्थित होते. तसेच डॉ. भालचंद्र मुणगेकर, उल्का महाजन, शफाअत खान, दीपक राजाध्यक्ष, मिलिंद जोशी, नीरजा, राहुल डंबाळे, मुक्ता दाभोलकर, जतीन देसाई, प्रकाश अकोलकर, प्रशांत कदम, कॉ. शैलेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील जनतेने प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा नेमण्याला तीव्र विरोध व्यक्त केल्यावर शासनाने प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करणारे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. मात्र त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमल्यामुळे शासन पुन्हा तिसरी भाषा लागू करण्याच्या विचारात आहे, असा अर्थ होतो. शासन गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून अशीच लबाडी करत असून त्यामुळे आम्ही तिसऱ्या भाषेविरुद्धचा लढा थांबवणार नाही, असा निर्धार कृती समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केला.