
नगर तालुक्यात बिबटय़ांचा मोठय़ा प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग भयभीत झालेला असून, सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतीपंपांना महावितरणने दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी विविध गावांतील सरपंच, उपसरपंचांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे शहर तथा ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, नगर तालुक्यात गावागावांत बिबटय़ांचा धुमाकूळ सुरू आहे. हे बिबटे मानवांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे, परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱयांचा खरीप हंगाम वाया गेला असून, त्यांच्या सर्व आशा रब्बी हंगामावर असल्याने शेतकऱयांना जीव मुठीत धरून रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. तालुक्यातील अकोळनेर, सारोळा कासार, भोरवाडी, घोसपुरी, खडकी परिसरात गेल्या काही दिवसांत बिबटय़ांचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱयांसाठी धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने शेतीपंपांसाठी थ्री-फेज वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अकोळनेरचे सरपंच प्रतीक शेळके, उपसरपंच संदीप जाधव, घोसपुरीचे माजी उपसरपंच प्रभाकर घोडके, सारोळा कासार सोसायटीचे संचालक संजय काळे, संदीप भोर, विजय चव्हाण, राजेंद्र भोर, दादासाहेब जाधव, संदीप जाधव, अक्षय साळुंखे, मयूर जाधव, नितीन लबडे, भोरवाडीचे पाराजी ठाणगे आदी उपस्थित होते.
पुणे जिह्यात बिबट प्रवण तालुक्यांमध्ये महावितरणने शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू केला आहे. त्याची अंमलबजावणी 3ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे. नगर तालुक्यात तसेच जिह्यातील अन्य काही तालुक्यांतही बिबटय़ांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे शेतीपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला द्यावेत, या मागणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचीही भेट घेणार आहे.
प्रतिक शेळके, सरपंच
































































