माघी गणपतीच्या विसर्जनाला परवानगी द्या, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

माघी गणेशोत्सवातील गणेश मंडळांच्या मूर्तींना विसर्जनांची परवानगी देण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशांनुसार उपरोक्त गणेश मंडळांनी शनिवारी 2 ऑगस्ट 2025 रोजी तलावात विसर्जन करण्याचे नियोजन केले आहे.

माघी गणपतीच्या विसर्जनापूर्वीच उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश पारित करून पीओपी मूर्ती नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्यास बंदी घातली. यामुळे संबधित गणेश मंडळांना गणेश मूर्तीचे सालाबादप्रमाणे डहाणूकर वाडी येथील तलावात विसर्जन करता आले नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या अंतिरम आदेशानुसार, सहा फुटांपेक्षा जास्त उंचीची पीओपी गणेश मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्याबाबत मार्च 2026 पर्यंत आदेश पारित केले आहेत. उच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशाकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

डहाणूकरवाडी तलाव कांदिवली पश्चिम (R South) वॉर्डच्या कक्षेत येतो. यामुळे गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी देण्याचे निर्देश आर दक्षिण वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात यावे. त्यामुळे संबधित वॉर्ड अधिकाऱ्यांना निर्देश दिले तर उपरोक्त मंडळाच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा होईल, अशी विनंती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिकेला केली आहे.