
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी डॉ. उमर नबी याचे पुलवामातील घर गुरुवारी मध्यरात्री स्फोट घडवून उडवून देण्यात आले. सुरक्षा दलांनी ही कारवाई केली.
दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्पह्टात 13 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले होते. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्यात डॉ. उमर होता हे डीएनए सॅम्पल मॅच झाल्याने स्पष्ट झाले आहे. त्यानंतर याप्रकरणी तपासाला गती आली असून सुरक्षा दलांनी मोठे पाऊल उचलत पुलवामातील कोईल भागातील उमरचे घर आयईडी स्फोट घडवून जमीनदोस्त केले.
हरयाणाच्या नूह जिह्यातील पिंगवान भागातून खत विव्रेता दिनेश सिंग ऊर्फ डब्बू याला चौकशीसाठी आज ताब्यात घेण्यात आले. त्याने डॉ. मुझम्मील शकील याला अमोनियम नायट्रेट पुरवल्याचा आरोप आहे.
अल-फलाहचे सदस्यत्व रद्द
चौकशीच्या फेऱयात आलेल्या फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व भारतीय विद्यापीठ संघटनेने रद्द केले आहे. नॅकनेही विद्यापीठाला नोटीस बजावली आहे.
तपास करण्यास हिंदुस्थानी अधिकारी सक्षम, आमची गरज नाही – अमेरिका
हिंदुस्थानचे तपास अधिकारी नेहमीप्रमाणे या प्रकरणाची चौकशी अत्यंत योग्य प्रकारे करीत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यात ते सक्षम असून त्यांना आमच्या मदतीची गरज नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माकां रुबिओ यांनी कॅनडा येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. पुढील घडामोडींवर आमचे लक्ष आहे, असे रुबिओ म्हणाले.























































