Pune: खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

khadakwasla pune

>>चंद्रकांत पालकर: पुणे

खडकवासला धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

आज सकाळी १० वाजता हा विसर्ग ३५,३१० क्युसेकवरून ३९,१३८ क्युसेक इतका करण्यात आला आहे. या वाढीव विसर्गामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या संदर्भात मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मोहन भदाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि पाण्याची येवा लक्षात घेऊन विसर्गात पुन्हा बदल केला जाऊ शकतो. आवश्यकतेनुसार हा विसर्ग कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.”

या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना, विशेषतः डेक्कन, शिवाजीनगर आणि इतर सखल भागांतील रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावावीत आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.