
पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते खेड दरम्यान असलेल्या शिरोली फाट्याजवळ आज वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. भरदुपारच्या रणरणत्या उन्हात ही कोंडी झाल्याने प्रवासी आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. तासनतास एकाच जागी अडकून पडल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचेच या वाहतुक कोंडीत हाल झाल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने मुंबई आणि पुण्याहून गावच्या दिशेने जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परिणामी वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शिरोली फाट्यावर तब्बल दोन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. चाकण परिसरात वाहतूक कोंडी ही नेहमीचीच बाब असल्यामुळे नागरिकांना एकप्रकारे त्याची सवय झालीये. मात्र, आता राजगुरुनगर परिसरातही अशा प्रकारची कोंडी वारंवार होत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
एकीकडे कोंडी वाढत असताना दुसरीकडे घटनास्थळी अद्याप वाहतूक पोलीस दाखल झाले नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे ही समस्या अधिकच गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिस्थिती पाहता, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.



























































