
शहरात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या चोरटय़ांनी चार बंद घरे फोडल्याची घटना आगरकरमळ्यात सोमवारी (26 रोजी) पहाटे घडली. मात्र, या चारही घरांत चोरटय़ांच्या हातात फार मोठा ऐवज हाती लागलेला नाही. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
चारचाकीतून आलेले आणि कापडाने तोंड बांधलेल्या चोरटय़ांनी सोमवारी पहाटे आगरकरमळ्यातील चार बंद घरे फोडली. घरांच्या खिडक्यांचे गज तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. सामानाची उचकापाचक केली. बेस्कर, गोहाड, व्यवहारे व आव्हाड यांची घरे फोडली आहेत. मात्र, या घरांमध्ये चोरटय़ांच्या हाती मोठा ऐवज लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीच्या घटना सकाळी उघडकीस आल्यावर नागरिकांनी याबाबत कोतवाली पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटे 3.30च्या सुमारास तीन ते चार चोरटे एका चारचाकी वाहनातून या परिसरात आल्याचे दिसले. त्यांनी माकडटोप्या घातल्या होत्या. त्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्वच ठिकाणी चोरटय़ांनी खिडक्यांचे गज तोडून आत प्रवेश केला असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळाल्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर विधानसभा समन्वयक दत्ता जाधव, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता खैरे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
स्टेशन रोड, आगरकरमळा परिसरात मोठी लोकवस्ती असून, या भागात कायमच चोऱया, घरफोडय़ा होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी. तसेच आगरकरमळ्यात विरंगुळा मैदान व कल्याण रोडवर गणेश मंदिर परिसरात पोलीस चौक्या उभारण्याची मागणी शिवसेना विधानसभा समन्वयक दत्ता जाधव यांनी केली आहे.