लाडकी बहीण कार्यक्रमासाठी गर्दीची जमवाजमव; तब्बल 175 एसटी, 500 पीएमपी बस बुक

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा हस्तांतरण कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बालेवाडी क्रीडा संकुलात होत आहे. या कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आहे. महिला बचत गटाच्या सदस्यांनाही उपस्थित राहण्याचा फतवा अधिकाऱ्यांनी काढला आहे. एसटीच्या 175 आणि पीएमपीच्या तब्बल 500 बस बुक केल्या असून, 1030 खासगी कार यामुळे ग्रामीण आणि शहरातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

वर्दळीमुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी या महामार्गावर शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत जड-अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चांदणी चौक ते उर्से टोलनाका दरम्यान चाकण येथून पिंपरी- चिंचवड मार्गे, तळेगाव, देहूरोड मार्गेही मुंबई- बंगळुरू महामार्गावर येण्या-जाण्यास जड- अवजड वाहनांना बंदी असणार आहे. यासाठी महापालिकेचे जवळपास 80 अधिकारी आणि 500 कर्मचाऱ्यांना जुंपले आहे. तसेच महिलांसाठी महापालिकेमार्फत नाष्टा व जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. हा सर्व खर्च शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून गोळा झालेल्या कररूपी पैशातून होणार आहे.

 

…तर फॉर्म रद्द करू

■ या कार्यक्रमासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे. आरोग्य खात्याच्या प्रत्येक कोठीवरून किमान दोन कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा तोंडी आदेश अधिकाऱ्यांनी दिला आहे. तर, महिला बचत गटांतील सदस्यांसाठी बसेस आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. नावनोंदणी आवश्यक आहे. ज्या महिला येणार नाही त्यांचा फॉर्म रद्द करण्याचा दमही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वाहतूक वळवली

■ विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळण घेऊन किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपासमार्गे जावे. मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडवर जाणाऱ्या वाहनांनी बालेवाडी जकातनाका येथून डावीकडे वळून हायस्ट्रीटमार्गे गणराज चौकातून जावे. पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळामार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे लागेल.