नीलेश चव्हाणविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असणारा नीलेश चव्हाणच्या मागावर पिंपरी-चिंचवडसह पुणे पोलीसही आहेत. मात्र दोन्ही पोलीस दलांना गुंगारा देत चव्हाण मोकाट फिरत आहे. आता चव्हाण परदेशात पळून जाऊ नये यासाठी त्याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘लुक आऊट’ नोटीस काढली आहे.

नीलेश रामचंद्र चव्हाण (35, रा. कर्वे नगर) याच्याविरोधात रविवारी (दि. 25) बावधन पोलिसांनी ‘लुक आऊट’ नोटीस जारी केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुह्यात शनिवारी (दि. 24) कलम वाढ करून नीलेश चव्हाणलाही सहआरोपी केले आहे. वैष्णवी यांच्या बाळाची हेळसांड केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहा महिन्यांचे बाळ चव्हाण याच्याकडे असताना कस्पटे कुटुंबीय त्याच्याकडे बाळ आणण्यासाठी गेले असता त्यांना नीलेशने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले होते. त्या प्रकरणातही वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात नीलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे. हे गुन्हे दाखल झाल्यापासून नीलेश चव्हाण पसार आहे.

दोन्ही पोलीस दलाची पथके त्याच्या मागावर आहेत. ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र पोलिसांना अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. नीलेश चव्हाणच्या भावासह त्याच्या संपर्कातील व्यक्तींकडेही बावधन पोलिसांनी रविवारी कसून चौकशी केली. दरम्यान, नीलेश चव्हाण हा परदेशात पळून जाऊ नये, यासाठी बावधन पोलिसांकडून त्याच्याविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस काढली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

बलेनो मोटार जप्त

वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर पसार झालेला तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पिता-पुत्र बलेनो, थार, इंडेव्हर अशा आलिशान कारमधून फिरल्याचे तसेच फार्म हाऊस, लॉज, शेतावर राहत यथेच्छ पार्ट्याही केल्याचे आणि मटणावर ताव मारल्याचेही समोर आले होते. दोघा बाप-लेकांनी प्रवास केलेल्या थार व इंडेव्हर मोटारी पोलिसांनी जप्त केल्या.