
‘माझी आई शारदा पवार या माझ्या जन्मावेळी लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या. तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांनी शिक्षणाच्या उपक्रमांबाबत बैठक बोलाविली होती. तेव्हा मी केवळ सहा दिवसांचा होतो. आई मला या बैठकीला घेऊन गेली होती. तेव्हा तिने मला काय शिकविले माहीत नाही; परंतु पुढे मी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव योगदान देऊ शकलो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शुक्रवारी पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘कृतज्ञता’ ग्रंथतुला करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान चव्हाण, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी खासदार अशोक मोहोळ, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कुमार गोसावी, चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रशांत बधे, अनिकेत चव्हाण आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी धायरी परिसर ग्रामीण भाग होता. त्याचा समावेश महापालिकेत झाला. विकास होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, येथील शेती संपली, बळीराजाची संख्या कमी झाली. चित्र बदलते, तसे लोकही बदलतात.
काकासाहेब चव्हाण, माजी खासदार अशोक मोहोळ, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
शरद पवार यांच्याशी रणजितसिंहांच्या गुजगोष्टी कार्यक्रमादरम्यान भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी शरद पवार यांच्याशी गुजगोष्टी केल्या. दोघांमध्ये काय चर्चा झाली, याविषयी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत.