Pune News – गाडा मालकाचा हट्टीपणा नडला; जेजुरी गडावर दर्शनासाठी आणलेले शर्यतीचे बैल उधळले, तीन भाविक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाच्या पूर्वेकडील पायरी मार्गावर भाविकांनी दर्शनासाठी आणलेले शर्यतीचे दोन बैल उधळल्याने तीन भाविक जखमी झाले. सकाळी 11 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. बैल उधळल्याने भाविकांची धावपळ झाली. बैळ उधळल्याने काही वेळ परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.

रविवार असल्याने खंडोबा गडावर जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी होती. सकाळी अकराच्या सुमारास खेड तालुक्यातील आंबेगाव येथील भाविकांनी दोन शर्यतीचे बैल खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आणले होते. पहिल्या पायरीला दर्शन घेण्याऐवजी या भाविकांनी हे शर्यतीचे बैल पायरी मार्गावरून वर चढवत नेले. अर्ध्या वाटेवर आले असता दोन्ही बैल अचानक उधळले व पायऱ्यांवरून खाली पळत सुटले. काही कळण्याच्या आत वेगात बैल पायरी मार्गावरून पळू लागल्याने भाविकांमध्ये व आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये घबराट निर्माण झाली. घाबरलेले भाविक पळू लागले. या घटनेत गड चढणारे शिवा भास्कर मोहे (बुलढाणा) विशाल रामदास कवळकर (बुलढाणा) ज्योती महेश पवार (जळगाव) हे भाविक पायरी मार्गावर पडून जखमी झाले. सुदैवाने यावेळी पायरी मार्गावर लहान मुले नव्हती ,त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. जखमी भाविकांवर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खंडोबा गडावर शर्यतीचे बैल व घोडे आणण्यास बंदी

जेजुरीच्या खंडोबा गडावर शर्यतीचे बैल व घोडे आणण्यास श्री मार्तंड देवस्थाने दोन वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे, तशा आशयाचे फलक सर्व रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. यापूर्वी गडावर बैलाने लाथ मारल्याने एक महिला जखमी झाली होती. त्यानंतर देवस्थानने गडावर बैल व घोडे आणण्यास पूर्णपणे मनाई केलेली आहे. आजच्या भाविकांना आजूबाजूच्या दुकानदारांनी गडावर बैले नेऊ नका असे सांगितले होते, तरीसुद्धा त्यांनी दुर्लक्ष करून बैलांना पायऱ्या चढायला लावल्या. त्यामुळे आजचा हा अपघात घडला. खंडोबा गडाच्या मुख्य नंदी चौकात सुद्धा गर्दीत अनेक जण बैल जोड्या घेऊन येतात बैलांच्या अंगावर भंडार उधळतात डोळ्यात भंडार गेल्याने बैल उधळण्याचे प्रकार घडतात.

भाविकांनी बैल व घोडे गर्दीत आणण्याचा हट्टीपणा करू नये

बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठल्याने अनेक राज्यातील अनेक भागात शर्यती सुरू असतात. भाविक शर्यतीचे बैल जेजुरीला खंडोबा दर्शनासाठी आणतात, मात्र त्यातून अनेक वेळा गंभीर प्रकार घडतात. दोन वर्षांपूर्वी गडावर बैल घोडे आणण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता बैल, घोडे गडावर येत नाहीत, मात्र तरीही काही बैलांचे मालक हट्टीपणाने पायऱ्यावरून बैल चढवत वर नेण्याचा प्रयत्न करतात. यातूनच अपघात होतात. भाविकांनी जेजुरीत देवाच्या दर्शनासाठी बैल व घोडे आणू नयेत त्यांना घरी नेऊन भंडारा लावावा, असे देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितले.