
पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अॅण्ड रन प्रकरणात दोन निष्पाप इंजिनीअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुराव्यांशी छेडछाड आणि रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप असलेल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने 18 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या आशिष सतीश मित्तल, आदित्य अविनाश सूद आणि अमर संतोष गायकवाड यांच्या प्रदीर्घ कोठडीचा विचार करत हा निकाल दिला आहे.
या तिन्ही व्यक्तींवर पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणात कारमध्ये असलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने स्वतःच्या रक्ताशी बदलल्याचा गंभीर आरोप आहे. कारमधील हे दोन्ही अल्पवयीन तरुण दारूच्या नशेत होते आणि त्यांना वाचवण्यासाठी हा कट रचल्याचे पोलिसांनी म्हटले होते. याप्रकरणी आरोपींवर फसवणूक, पुराव्यांशी छेडछाड, लाचखोरी आणि भ्रष्टाचारशी संबंधीत कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी आशिष मित्तल हे कारमध्ये मागे बसलेल्या मुलाच्या वडिलांचा मित्र आहे, तर आदित्य सूद हे कारमधील दुसऱ्या मुलाचे वडील आहेत. तिसरा आरोपी अमर गायकवाड याने हे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आणि मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप आहे. दरम्यान हे तिन्ही व्यक्ती गेल्या 18 महिन्यांपासून तुरूंगात आहेत. त्यांच्या प्रदीर्घ कोठडीचा विचार करून जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर त्यांना संबंधित ट्रायल कोर्टासमोर हजर केले जाईन. ट्रायल कोर्टाकडून अटी व शर्तींनुसार या तिघांची सुटका केली जाईल.




























































