
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-जाधववाडी नजीक असलेल्या गद्रे पेट्रोल पंपासमोर एका खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागून ती जळून खाक झाली. सुदैवाने, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात यश आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चालक गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) हे आपली ट्रॅव्हल्स (क्रमांक: NL 01 B 2442) घेऊन गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. या बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. दरम्यान शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता ही बस साखरपा येथील जाधववाडी गद्रे पेट्रोल पंपासमोर आली असता, अचानक बसने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
गाडीला आग लागल्याचे समजताच चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखून तातडीने गाडी थांबवली आणि सर्व 30 प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. केवळ दैव बलवत्तर म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र, तोपर्यंत आगीत बस पूर्णतः भस्मसात झाली होती, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवून वाहतूक कोंडी सोडवली आणि प्रवाशांना आवश्यक सहकार्य केले.





























































