महामार्गावर टायर बदलताना भरधाव ट्रकची डिफेंडरला धडक; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खुशबाज जटाणा यांच्यासह चालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणातील सोनीपत येथे ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खुशबाज जटाणा आणि त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. जाखोली टोल प्लाझाजवळ ही घटना घडली असून, एका भरधाव ट्रकने त्यांच्या उभ्या असलेल्या डिफेंडर कारला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत जटाणा यांचे अंगरक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बठिंडा ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष 45 वर्षीय खुशबाज जटाणा हे दिल्लीहून पंजाबच्या दिशेने परतत होते. वाटेत त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान मागून येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या गाडीला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की जटाणा यांच्या आलिशान कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. घटनेनंतर ट्रक चालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी संबंधित ट्रकची ओळख पटवली असून आरोपी चालकाचा शोध घेतला जात आहे.

खुशबाज जटाणा यांनी 2017 आणि 2022 मध्ये तलवंडी साबो विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सध्या मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.