पुरीचे जगन्नाथ महाप्रभू

जिथे देवही पुनर्जन्म घेतात!

संजय राऊत

[email protected]

पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दर्शन एकदा तरी घ्यावेच. कला आणि  वास्तुशिल्पाचा हा उत्तम नमुना. रथयात्रेच्या निमित्ताने कोटय़वधी लोक येथे शिस्तीत जमतात. माणसांना पुनर्जन्म आहे काय हा वादाचा विषय, पण पुरीत देवांचे ‘नवकलेवर’ म्हणजे पुनर्जन्म होत असतात!

मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुवनेश्वरात दोन दिवस होतो. ओडिशा राज्याची ही राजधानी, पण पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताचा मोठा उत्सव येथे १६ तारखेला पार पडला. भुवनेश्वर ते पुरी रस्त्यांवर फक्त या दोन नेत्यांचे भव्य कटआऊटस् सर्वत्र लागले. त्यामुळे मंदिरांचे शहर काही काळापुरते ‘भाजपमय’ झालेले दिसले. जगन्नाथांची रथयात्रा निघते तसा भव्य जुलूस भुवनेश्वरच्या रस्त्यांवर त्या दिवशी मोदींच्या स्वागतासाठी निघाला. राजकारणात नेत्यांना देवत्व प्राप्त होते व काही काळ त्या नेत्यांस मखरांत बसवून पूजा केली जाते. गांधी, नेहरूंपासून आजपर्यंत हे सुरूच आहे, पण भुवनेश्वरपासून साठ किलोमीटरवर पुरीतील महाप्रभू जगन्नाथांचे माहात्म्य आजही कायम आहे. पुरीतील जगन्नाथांच्या दर्शनासाठी त्या भव्य मंदिरांच्या प्रांगणात पोहोचलो व अद्भुत वास्तू आणि शिल्पकलेचा नमुना पाहून थक्क झालो. देव मखरात आहेत, पण ज्यांनी देवांसाठी हे भव्य शिल्प घडवले त्यांचे हातही जणू देवांचेच होते.

मंदिर कायदा

जगन्नाथ मंदिराचा ‘टेम्पल अॅक्ट’ आहे. त्या कायद्याने आजही मंदिराचा   कारभार चालतो. फक्त हिंदूंनाच मंदिरात प्रवेश मिळतो. काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्या काळात मोठे आंदोलन झाले, पण जगन्नाथ मंदिराचे दरवाजे इतर धर्मांतील श्रद्धाळूंसाठी अद्यापि उघडले नाहीत. जे धार्मिक नाहीत व जे देव मानायला तयार नाहीत अशा सगळय़ांनी आपल्या भव्य मंदिरांची परंपरा, त्यासोबत गुंतलेल्या कथा, दंतकथांचा अभ्यास केला पाहिजे. पण जे मंदिरात जात नाहीत त्यांच्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची देवांविषयीची भूमिका सांगतो. ‘रॉयवादी’ म्हणून ते देव मानत नव्हते, पण अनेक देवळांना ते भेटी देत असत.  ‘‘देव मानत नाही तर मग तुम्ही देवळात कसे जाता?’’ या प्रश्नावर त्यांचे उत्तर असे, ‘‘मंदिराचे शिल्प, स्थापत्य पाहण्यासाठी जातो.’’ त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नव्हता. ‘‘पाप-पुण्याचे जे देणेघेणे ते सर्व याच जन्मात’’, असे ते सांगत. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात देवाच्या पुनर्जन्माचा सोहळा होतो हे इथे मुद्दाम नमूद करतो.

विश्वाचा स्वामी

भगवद्गीतेच्या १५व्या अध्यायात महाप्रभू जगन्नाथांना विश्वाच्या स्वामीचे स्थान दिले आहे. वाल्मीकी रामायणाच्या उत्तरकांडात श्रीराम बिभीषणास जगन्नाथाची पूजा करण्याचा सल्ला देतो. जगन्नाथांची रथयात्रा निघते. त्यात दुतर्फा दोन कोटी भक्त सामील झालेले दिसतात. हिंदू समाजाचे इतके संघटन कुठेच होत नाही व जगभरातील श्रद्धाळू येथे पोहोचतात. आज जे मंदिर आहे ते १२व्या शतकात निर्माण झाले. गंग वंशाचा प्रतापी राजा चोलगंगदेवाने मंदिर उभारणीस प्रारंभ केला. एक हजार वर्षे जुने मंदिर कलिंग स्थापत्यकला आणि शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. मंदिराची उंची २१४ फूट ८ इंच. पंचरथ आकाराचे हे शिल्प. मंदिराच्या चारी बाजूंनी तटबंदी. मंदिराचे चार भाग आहेत. विमान, जगमोहन, गटमंडप आणि भोगमंडप. महत्त्वाचा भाग म्हणजे  रत्नवेदी. तिथे प्रत्यक्ष महाप्रभू जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा आणि सुदर्शन विराजमान आहेत. रत्नवेदी १६ फूट लांब आणि ४ फूट उंच आहे. जगन्नाथांच्या उजव्या बाजूला धातूमूर्ती स्वरूपात भूदेवी म्हणजे सरस्वती आणि डाव्या बाजूला श्रीदेवी म्हणजे लक्ष्मीजी विराजमान आहेत. बलभद्र येथे रुद्राचे प्रतीक आहेत. सुभद्रा आदिशक्ती आणि महाप्रभू जगन्नाथ विष्णूचे प्रतीक आहेत. या तीनही शक्ती भूत, वर्तमान आणि भविष्याच्या प्रतीक मानल्या जातात. सुदर्शनचक्र  नारायणाचे प्रतीक मानले जाते.

गोपाल  अर्चना

देवांचा पूजाविधी हा श्रद्धेचा सोहळा ठरतो. ‘गोपाल अर्चना’ विधी असे या पूजेस म्हटले जाते. राजा प्रतापरुद्र देवाने या पूजेचा शुभारंभ केला. १९५५ पासून श्री मंदिरात रोज पाचवेळा पूजा होते. दिवसा तीनवेळा आणि रात्री दोनवेळा. जगन्नाथांची पूजा बीजमंत्राने, बलभद्रांची पूजा १२ वासुदेव मंत्राने आणि सुभद्रेची पूजा भुवनेश्वरी मंत्राने होत असते. श्री विमलादेवींच्या विहिरीतून या विधीसाठी खास पाणी आणले जाते. आपण भलतेच श्रद्धाळू आहोत. जगन्नाथांच्या बाबतीत हिंदू समाजाच्या श्रद्धा अशा की, संपूर्ण भारतवर्षातील चारही धामांत जगन्नाथाचे वास्तव्य आहे. बद्रीनाथमध्ये देव स्नान करतात, द्वारकेत शृंगार करतात, पुरीत अन्नग्रहण करतात आणि रामेश्वरात ‘शयन’ करतात.

भव्य पाकशाळा

श्री मंदिराची पाकशाळा हे जगातले आश्चर्य मानावे लागेल. जगातली सगळय़ात मोठी पाकशाळा असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. देवाबरोबर येथे रोज लाखो भक्त जेवतात. पाकशाळेत ७०० आचारी आहेत. फक्त ४५ मिनिटांत येथे १० हजार लोकांचे जेवण बनू शकते. २०० चुली येथे २४ तास पेटलेल्या असतात. महाप्रसादाचे स्वरूपही भव्य. दूध, दही, तूप, तांदूळ, नारळ, साखर, फळे, भाज्या, डाळ यांपासून ५६ प्रकारचे पदार्थ खास देवांसाठी बनवले जातात. सर्वप्रथम प्रसाद महाप्रभू जगन्नाथांच्या समोर येतो. नंतर विमलादेवीकडे. ही परंपरा शतकांची आहे. महाप्रसाद आयुर्वेद शास्त्रानुसार बनवला जातो व तो आरोग्यवर्धक असतो. सर्व प्रकारच्या आजारांना हा महाप्रसाद दूर ठेवतो. त्यामुळे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अनेक रुग्ण येथे येतात. ही जगन्नाथांची कृपा आहे. मंदिराच्या आनंद बाजारात महाप्रसादाची विक्री होते. जगातले हे सगळय़ात मोठे ‘मुक्त उपाहारगृह’ आहे. रात्रीच्या वेळीही या उपाहारगृहात किमान पाच हजारांवर लोक महाप्रसादाचा लाभ घेताना मी पाहिले. महाप्रभू जगन्नाथ हा गोरगरीबांचा देव. येथे श्रीमंती बडेजाव नाही. पंढरपूरचा विठोबा आणि पुरीचा महाप्रभू जगन्नाथ हे कष्टकऱयांचे मातापिता. महाप्रभू जगन्नाथांच्या मंदिरात शिरताना मला तेथील सेवेकऱयाने सांगितले, ‘‘साहेब, नोटाबंदीचा  फायदा पुरीच्या महाप्रभूंना झाला नाही.’’ मी त्यांना विचारले, ‘‘हे असे का म्हणता?’’ त्यावर तो सेवेकरी म्हणाला, ‘‘नोटाबंदीनंतर अनेक मंदिरांच्या दानपेटीत कोटय़वधींचे दान जुन्या नोटांच्या बंडलांच्या स्वरूपात पडले. त्या अज्ञात भक्तांनी स्वतःची श्रीमंती देवांकडे वळवली व थोडे पुण्य पदरी पाडून घेतले. तसे जगन्नाथांच्या बाबतीत घडले नाही!’’ यावर मी त्यास पंढरपूरच्या विठोबाचे उदाहरण दिले. हे देव गरीबांचे व कष्टकऱयांचे. त्यांच्या दानपेटीत पन्नास आणि शंभराची नोट अभावानेच आढळेल. पाच-दहा रुपये व नाणीच सापडतील. या देवांना कुणी सोन्याची सिंहासने व रत्नजडित मुकुट देणार नाहीत व दानपेटीत सोन्याची बिस्किटे टाकून भक्त पळ काढणार नाहीत. श्रीमंत देवांच्या आणि मंदिरांच्या यादीत पंढरपूरचा विठोबा आणि पुरीचे महाप्रभू येणार नाहीत. हीच त्यांची श्रीमंती. तरीही कोटय़वधी भक्त त्यांच्या दारात हात जोडून उभे आहेत.

कला आणि वास्तुशिल्प

पुरीचे मंदिर हे कला आणि वास्तुशिल्पाचे अनन्यसाधारण उदाहरण आहे. वेदांमध्ये स्थापत्यशास्त्र्ााचे मार्गदर्शन आहे. दहा एकरांच्या परिसरात जगन्नाथ मंदिर आहे. मंदिराचे निर्माण खुल्या विशाल प्रांगणात व्हावे असे वास्तुशिल्पशास्त्र्ा सांगते. शास्त्र्ाानुसार मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार चारी दिशांना मोकळे असायला हवे. पूर्व दिशा सर्वश्रेष्ठ मानली जाते. जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे आहेत. पूर्वेकडील सिंहद्वार मुख्य द्वार आहे. पाकशाळा पूर्व-दक्षिण कोपऱयात असायला हवी. वास्तुशिल्पशास्त्रानुसार मुख्य द्वारासमोर काही मूर्तींची स्थापना  असायला हवी. मंदिराच्या सर्वच दारांसमोर वेगवेगळय़ा मूर्ती  आहेत. त्यात दोन्ही बाजूंनी सिंह, गजराज, वाघांचा समावेश आहे. वास्तुशिल्पशास्त्र्ाानुसार कडुलिंब, पिंपळ, तुळस, नारळ, पान-सुपारी, चंदन, आम्रवृक्षांना पवित्र मानले जाते. मंदिराच्या रत्नवेदीवर विराजमान तीनही मूर्ती याच लिंबाच्या फांद्यांपासून बनल्या आहेत. हे सर्व वृक्ष मंदिराच्या प्रांगणात बहरले आहेत. आमच्या पूर्वजांना पर्यावरणाची काळजी होती हे मंदिरात पोहोचल्यावर दिसले.

आत्मा देवांचा

मोगलांची आक्रमणे पुरीच्या जगन्नाथांवरही झाली आहेत. महाराष्ट्रातील अनेक साधुसंतांनी समाधी घेण्यासाठी ‘पुरी’ क्षेत्राची निवड केली. छत्रपती  शिवाजी महाराज व मातोश्री जिजाबाईंची पुरीच्या जगन्नाथांवर भक्ती होती हे महत्त्वाचे. मी स्वतः मंदिरातून बाहेर पडताच महाराष्ट्राच्या रायगड जिल्हय़ातून पोहोचलेले दोनशे भक्त मला दिसले. लोक श्रद्धेने येतात व शांतपणे निघून जातात. गोंगाट नाही, कलकलाट नाही. भजन-कीर्तनाचे सूर कानी पडतात. मुख्य म्हणजे ते लाऊड स्पीकरशिवाय असतात. त्यामुळे कानाला सुखावून जातात. ‘नवकलेवर’ आणि ‘रथयात्रा’ हे दोन महत्त्वाचे प्रसंग देवाच्या जीवनात येतात. ज्या वर्षी दोन आषाढ महिने पडतात त्या वर्षी जगन्नाथाचे नवकलेवर होते. हिंदुस्थानी संस्कृतीच्या श्रद्धेचे हे प्रमाण आहे. जुन्या देवांना निरोप आणि नवीन देवांचा जन्म. देव नवीन शरीर धारण करतात. नवे शरीर, नवा आत्मा. पुनर्जन्मावर श्रद्धा ठेवणाऱयांसाठी हे महत्त्वाचे. जिथे देवांचाच पुनर्जन्म होतो तिथे माणसांनी पुनर्जन्मावर का विश्वास ठेवू नये? ‘अधिक आषाढ’ आठ वर्षांत, ११ वर्षांत, कधी १९ वर्षांत एकदा येतो व देवांना पुनर्जन्म देऊन जातो. नवी मूर्ती बनवून त्यात आत्मा फुंकण्याची परंपरा व शास्त्र आहे. ते रोमांचक आहे.

रथयात्रा महत्त्वाची!

महाप्रभू जगन्नाथांची रथयात्रा जगविख्यात मानली जाते. प्रत्येक वर्षी तीन नवे भव्य रथ बनवले जातात. रथांचे निर्माण हा एक धार्मिक उत्सव ठरतो. वसंत पंचमीपासून रथांसाठी लाकडे आणण्याचे  कार्य सुरू होते. सर्व लाकडे ओडिशाच्या दशपल्ला जंगलातून आणली जातात. अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासून रथ निर्माणाच्या कार्याची सुरुवात होते. रथयात्रा रोमांचक असून जणू प्रत्यक्ष देव-देवता रथांतून येत आहेत असाच भास होतो. लाखो भक्त रथ खेचतात व श्रद्धा अर्पण करतात. हिंदू परंपरा व संस्कृतीचे महान दर्शन यानिमित्ताने घडते, पण शेवटी त्या परंपरांच्या जोखडातून आपण आजही बाहेर पडायला तयार नाही. अहिंदूंना प्रवेश नाही हे पाहिले. त्या दिवशी मंदिराच्या काही सेवकांनी ‘ममता बॅनर्जी यांना मंदिर प्रवेश नको’ म्हणून बोंब मारली. गोमांसासंदर्भात ममतांची भूमिका हिंदूविरोधी आहे असे या सेवकांचे म्हणणे. देव नवे शरीर, नवा आत्मा धारण करतो. भक्तांनीही तो कधीतरी   धारण करावा. महाप्रभूंचे दर्शन घेताना हे जाणवले.

आपली प्रतिक्रिया द्या