
कोपरगाव तालुक्यातील शाळांमध्ये प्रश्नपत्रिका पुरवठय़ाच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. हा केवळ गोंधळ नसून, संगनमताने चालवला जाणारा आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या व एस. जी. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर यांनी पुढे येत 241 प्रश्नपत्रिका कमी आल्याचा मुद्दा उचलून धरताच, प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
संगीता मालकर यांनी उघड केलेले वास्तव धक्कादायक आहे. पॅट परीक्षा सुरू झाल्यापासून दरवर्षी हा प्रकार सर्रास सुरू असून, प्रत्येक शाळेत झेरॉक्स केलेल्या प्रश्नपत्रिका दिसणे, हे आता नवीन नाही. गोपनीयतेच्या नावाखाली खासगी ठेकेदारांना दिलेले काम प्रत्यक्षात ‘कमिशनखोरी’चे अड्डे बनल्याची चर्चा शिक्षकांमध्ये होत आहे.
एका शाळेची आकडेवारी पाहिली तरी या घोटाळ्याचे भीषण चित्र समोर येते. इयत्ता दुसरीसाठी 145 विद्यार्थ्यांसाठी केवळ 35 प्रश्नपत्रिका म्हणजे 110 कमी, तिसरीसाठी 159 पैकी 98 म्हणजे 61 कमी, तर चौथीसाठी 175 पैकी 105 म्हणजे 70 कमी म्हणजे फक्त गणित या एका विषयासाठी तब्बल 241 प्रश्नपत्रिकांचा तुटवडा! ही केवळ एका शाळेची आकडेवारी असून, संपूर्ण तालुक्यात किती मोठा घोटाळा असेल याचा अंदाज येतो, असा आरोप शिक्षक करीत आहेत.
अतिरिक्त बोजा शिक्षकांवर का?
प्रश्नपत्रिकेचे टेंडर दर प्रतिपान 1.60 रुपये धरला, तर साधारण 10 पानांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 16 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या हिशेबाने 241 प्रश्नपत्रिकांसाठी 3856 रुपयांचा हिशेब होतो; पण प्रत्यक्षात हीच प्रश्नपत्रिका झेरॉक्स काढायची, तर प्रती 20 रुपये खर्च म्हणजे 4820 रुपये खर्च होतो. हा अतिरिक्त बोजा शिक्षक का उचलणार, असा सवाल होत आहे. प्रश्नपत्रिका कमी, दर वाढलेले आणि वरून गोपनीयतेच्या नावाखाली दडपशाही, या सगळ्यात शिक्षक अडकले आहेत. प्रश्नपत्रिका बाहेर काढली तर ‘पेपर फुटला’ म्हणून कारवाई आणि झेरॉक्स काढली नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसान, असा उलटा न्याय सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
खासगी टेंडरमुळे ‘खेळ’ सुरू
पूर्वी शाळा किंवा स्थानिक प्रशासनच प्रश्नपत्रिका तयार करत होते, तेव्हा असा गोंधळ नव्हता. पण खासगी टेंडर आल्यानंतर हा ‘खेळ’ सुरू झाल्याचे शिक्षक सांगतात. याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याची भूमिका, यामुळे यामागचा संशय अधिकच गडद होत आहे.
प्रश्नपत्रिका पुरवठय़ातील ही अनियमितता अत्यंत गंभीर आहे. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर मोठय़ा भ्रष्टाचाराचे लक्षण आहे. यामागील साखळी उघड करणे आणि सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे
– हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक




























































