मंदिरातील भंडारा खाऊन परतणाऱ्या 9 मुलींना भरधाव कारने उडविले; चौघींचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यात निर्माणाधीन गंगा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. रविवारी रात्री भरधाव कारने पायी चाललेल्या नऊ मुलींना उडवले. यात 4 मुलींचा मृत्यू झाला असून 5 गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगतपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या चुली गावाजवळ हा अपघात झाला.

चुली गावात काही दिवसांपूर्वीच उभारण्यात आलेल्या मंदिरात रविवारी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडाऱ्यासाठी आजूबाजूच्या गावातून शेकडो लोक आले होते. धार्मिक विधी आणि भंडाऱ्याचे जेवण आटोपल्यावर चुली, कोडर, आणि हनुमानगंज गावातील दहा-बारा मुली पायी घरी निघाल्या होत्या. याचवेळी निर्माणाधीन गंगा एक्सप्रेस वेवर लालगंजकडून जाणाऱ्या भरधाव कारने पायी चालणाऱ्या मुलींना उडविले.

अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेनंतर मुली हवेत उडाल्या आणि रस्त्यावर आपटल्या. यात दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर दोघींचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शालिनी (वय – 22), हिमांशी (वय – 23), रश्मी (वय – 14) आणि आसमा (वय – 18) अशी मृतांची नावे आहे. सर्व मयत मुली कोडर येथील रहिवासी होत्या. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली.

या अपघातात 5 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर आधी जगतपूर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलींची प्रकृतीही गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली आहे. परंतु कारचालक अपघातानंतर फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे गंगा एक्सप्रेस वे अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही, त्यानंतरही कायद्याला न जुमानता वाहन चालक यावरून भरधाव वेगात गाड्या चालवत आहे.