
आम आदमी पार्टीने राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांना उपनेतेपदावरून काढून टाकले आहे. यानंतर त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या या कारवाईनंतर चढ्ढा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. गप्प करण्यात आलंय, पण पराभूत नाही, असे म्हणत त्यांनी ‘आम आदमी’ला खास संदेश दिला आहे.
राघव चढ्ढा यांच्या प्रतिक्रियेला पक्षाचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनुराग ढांडा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राघव यांनी केलेल्या या वक्तव्यावर अनुराग ढांडा यांनी जोरदार टीका केली. राघव चड्ढा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलायला घाबरत आहेत. देशाचे महत्त्वाचे प्रश्न मांडण्याऐवजी चड्ढा यांनी संसदेचा अमूल्य वेळ विमानतळावरील कॅन्टीनमध्ये ‘समोसे’ स्वस्त करण्यासारख्या विषयावर चर्चा करण्यात वाया घालवल्याचा गंभीर आरोप पक्षाने केला आहे. संकटकाळी डगमगून जाणारा नेता राष्ट्राच्या लढाया कशा लढू शकेल? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हम केजरीवाल के सिपाही हैं। निडरता पहली पहचान है हमारी।
कोई मोदी से डर जाए तो लड़ेगा क्या देश के लिए?
संसद में थोड़ा सा समय मिलता है बोलने का पार्टी को, उसमें या तो देश बचाने का संघर्ष कर सकते हैं या एयरपोर्ट कैंटीन में समोसे सस्ते करवाने का।
गुजरात में हमारे सैंकड़ों…
— Anurag Dhanda (@anuragdhanda) April 3, 2026
पक्षाच्या मते, संसदेत बोलण्यासाठी मिळणारा वेळ हा देशाच्या रक्षणासाठी आणि जनतेच्या मुद्द्यांसाठी वापरला पाहिजे. चड्ढा यांनी वारंवार पक्षाच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेतली आणि महत्त्वाच्या प्रस्तावांवर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला, असा दावा ढांडा यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील ठरावावर स्वाक्षरी करण्यास चड्ढा यांनी नकार दिलापक्षाचे इतर सदस्य सभात्याग करून बाहेर गेले असतानाही ते पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणादरम्यान बसून राहिले होते, असेही ढांडा म्हणाले.
चढ्ढा यांनी कधीही पक्षाची बाजू घेतली नसल्याचा आरोप ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनीही केला आहे. जेव्हा गुजरातमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली किंवा त्यांच्यावर हल्ले झाले, तेव्हा राघव चड्ढा यांनी संसदेत आवाज उठवला नाही. लोकांच्या हिताच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे.

























































