अमेरिकेच्या मैदानांवर दुखापतींची भीती; टीम इंडियाने व्यक्त केली चिंता

वाळूच्या मैदानांवर खेळणे आव्हानात्मक असल्याची टी-20 वर्ल्ड कपचा सामना खेळण्यापूर्वीच प्रशिक्षक राहुल द्रविडची प्रतिक्रिया आली आहे. हिंदुस्थानी खेळाडूंना अशा आऊटफिल्ड असलेल्या मैदानांवर खेळण्याची सवय नसल्यामुळे दुखापतींची भीती असल्याचीही चिंता त्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूंना जरा जपूनच खेळावे लागणार आहे. नासाऊ काऊंटीने कमी वेळात सुंदर स्टेडियम उभारल्याबद्दल द्रविडने त्यांचे काwतुक केले, पण वाळूच्या जमिनीवर खेळताना खेळाडूंच्या दुखापतींची शक्यता नेहमीच वाढते. विशेष करून क्षेत्ररक्षण करताना गुडघे आणि मांडीचे स्नायू दुखावले जाण्याची शक्यता द्रविडने बोलून दाखवली. खुद्द अर्शदीप यादव आणि शिवम दुबेने अमेरिकन आऊटफिल्ड क्षेत्ररक्षणासाठी आव्हानात्मक आहे. अशा मैदानांवर क्षेत्ररक्षण करणे नक्कीच सोपे नसल्याचे दुबेने सांगितले. आऊटफिल्ड वाळूवर बनवल्यामुळे जमीन थोडी नरम आहे आणि अशा मैदानावर धावताना गुडघे आणि मांडय़ांवर थोडा दबाव येत असल्याचे अर्शदीपने सांगितले. सध्या आम्ही या मैदानांवर क्षेत्ररक्षणाबाबत थोडे काम करतोय. कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याचीही माहिती घेतोय. अशी मैदाने काही वेळा दमवणारी वाटतात तर कधी थोडी मऊ वाटतात, असेही अर्शदीप म्हणाला.  2020 साली यूएईत झालेल्या आयपीएलदरम्यानही हिंदुस्थानी खेळाडूंना वाळूच्या मैदानांवर केलेल्या आऊटफिल्डचा त्रास झाला होता आणि कर्णधार रोहित शर्मासह किमान पाच खेळाडूंनी मांडीचे स्नायू ताणल्याची तक्रार केली होती.